Fri, Jul 19, 2019 05:31होमपेज › Nashik › दिव्यांग सरपंच तरुणीने रुळावर आणला गावगाडा...

दिव्यांग सरपंच तरुणीने रुळावर आणला गावगाडा...

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 11 2018 11:28PM

बुकमार्क करा
नाशिक : सुदीप गुजराथी

पोलिओमुळे अपंगत्व आलेली 30-32 वर्षांची तरुणी दोन गावांचे सरपंचपद सांभाळते काय आणि ग्रामपंचायतींच्या कारभारात कायापालट घडवून आणते काय, सारेच अप्रूप. पण दिंडोरी तालुक्यातील कविता भोंडवे हिने हे शक्य करून दाखविले आहे. या तरुणीने नुसता गावाचा कारभारच रुळावर आणला नाही, तर गावातील अवैध धंद्यांविरुद्धही ती उभी ठाकली अन् कोणी अपंगत्वावरून हिणवल्यावर ‘मी माणूस नाही का’ असा जाब विचारण्याची हिंमतही तिने दाखवली. 

दिंडोरी तालुक्यातील दहेगाव व वागळूद या दोन्ही गावांची मिळून दहेगाव ग्रुप ग्रामपंचायत. शेतकरी पुंडलिक भोंडवे हे 15 वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य; मात्र पुरेसे शिक्षण नसल्याने त्यांच्या कामाची गाडी अडायची. त्यामुळे सन 2011 मध्ये त्यांनी मुलगी कविताला निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला. कविता तेव्हा जेमतेम 24-25 वर्षांची होती. ती निवडणुकीत निवडून आली आणि सर्वानुमते सरपंचपदीही निवडली गेली.

पूर्वी कधी ग्रामपंचायत कारभाराशी संबंध आलेला नाही. ठराव, ग्रामसभा हे नुसते शब्दच कानावरून गेलेले. सरपंच होणे म्हणजे नक्‍की काय, याचेही नीट आकलन नाही. त्यातच कविता पायाने अपंग. कुबड्यांच्या आधाराने चालणारी. अशा परिस्थितीत हार न मानता कविताने वडील व गावातील ज्येष्ठ मार्गदर्शकांकडून कारभाराचे धडे घेतले.  एवढी लहान मुलगी गावाची सरपंच झाली, हे तेव्हा अनेकांना आवडले नाही. त्यातच ती दिव्यांग. पदावर नवीन असताना तिला टोमणे मारले जाऊ लागले. एकदा ती रस्त्याने जात असताना, एकाने ‘ही आमच्या गावची सरपंच’ असे कुत्सित उद‍्गार काढले.

ते ऐकून कविता मागे फिरली अन् ‘मी माणूस नाही का? माझ्याकडून सरपंचपद पेलवले न गेल्यास पद सोडून देईन; पण समाजसेवा सोडणार नाही’ असे त्याला ठणकावून सांगितले.  नंतर कविताने कधी मागे वळून पाहिले नाही. ग्रामपंचायतीचा कारभार समजावून घेतला. ग्रामपंचायतीच्या बैठका, ग्रामसभा नियमितपणे, रीतसर बोलावू लागली. भ्रष्टाचाराला बाहेरचा रस्ता दाखवला. दहेगाव व वागळूद या दोन्ही गावांतील महिलांचे बचतगट स्थापन केले. त्यांना पहिल्या वर्षी 15 हजार, दुसर्‍या वर्षी एक लाखाचे कर्ज मिळवून दिले. गावातील दारू दुकाने, मटक्याच्या अड्ड्यांविरोधात एल्गार पुकारला. महिलांना संघटित करून पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडले. कविताच्या या प्रयत्नांनंतर गावातील अवैध धंदे बंद झाले. 

सध्या कविताची सरपंचपदाची दुसरी टर्म आहे. दोन्ही गावांनी दुसर्‍यांदाही एकमताने तिलाच सरपंच केले आहे. सात वर्षांत तिने दोन्ही गावांचा गाडा रुळावर आणला आहे. मुलींमध्ये शिक्षणाची जागृती करणे, स्वच्छता मोहीम याबाबतही ती कार्य करते. त्यासाठी तिने विवाहही केला नाही. ती सांगते, ‘दुसर्‍यांदा सरपंच होण्याची इच्छा नव्हती. पण ग्रामस्थांच्या आग्रहामुळे पद स्वीकारले. आता मात्र समाजकार्याची गोडी लागली आहे. पुढे मी या पदावर राहीन न राहीन; पण हातून समाजसेवा अविरत घडत राहील. सात वर्षांच्या कारकीर्दीने मला ती हिंमत दिली आहे!’ - शहरातील तरुणाई ‘डे’ज् आणि सोशल मीडियात गुंतली असताना, कवितासारखी ग्रामीण तरुणी गावासाठी झोकून देण्याचा मानस व्यक्‍त करते, तेव्हा तिच्या रूपाने लहानशी का होईना, आशेची तिरीप लकाकू लागलेली असते... शहरी काळोखात ती पुरेशी असते!