Tue, Apr 23, 2019 10:20होमपेज › Nashik › विभाग नियंत्रकांच्या आदेशाला केराची टोपली

विभाग नियंत्रकांच्या आदेशाला केराची टोपली

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 07 2018 11:58PMओझर : मनोज कावळे

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक-सटाणा, नाशिक-मालेगाव आगाराच्या बसचालक-वाहकांनी ओझर, पिंपळगाव (ब.) स्थानकात प्रवाशांची चढउतार करावी, असे लेखी आदेश संबंधित आगारप्रमुखांना देऊनही मुजोर चालक-वाहक या स्थानकात बस आणत नसल्याने एकप्रकारे विभाग नियंत्रकांच्याच आदेशाला केराची टोपली दाखविली जात आहे.

ओझर टाउनशिप, ओझरगाव, पिंपळगाव येथून आपल्या दैनंदिन कामानिमित्त प्रवासी, विद्यार्थी प्रवास करीत असतात. त्यातच एचएएलसारख्या महत्त्वाच्या असलेल्या विमान कारखान्यामुळे ओझर शहराचे एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. व्यापारी पेठ व आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून पिंपळगावची ओळख निर्माण झाली आहे. या दोन्ही शहरांतून सटाणा, मालेगाव येथे जाणार्‍या प्रवाशांची संख्यादेखील मोठी आहे. परंतु, नाशिक-सटाणा आणि नाशिक-मालेगाव या गाड्या येथील स्थानकात येतच नसल्याने येथील प्रवाशांना मोठा द्रविडी प्राणायाम करीत महामार्गावर जाऊन बस पकडावी लागते. नाशिक येथूनच ओझरला येण्यासाठी या गाड्यांवरील वाहक मध्यवर्ती बसस्थानकातूनच आपली मनमानी करीत प्रवाशांना बसण्यास अटकाव करतात. प्रवाशांनी गयावया केल्यास त्यांचे ओझर, पिंपळगावचे तिकीट काढून त्यांना महामार्गावरच उतरून दिले जाते.

रात्री- अपरात्री प्रवाशांना महामार्गावर उतरून दिल्यानंतर अंधारातच त्यांना महामार्ग ओलांडून पायपीट करीत गावात यावे लागते याचा सर्वाधिक त्रास वृद्धांना सहन करावा लागतो. यावरून अनेकदा प्रवासी व वाहकांचे खटके उडतात. स्थानिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा वाहक आणि चालकांना समजावून सांगूनही चालक-वाहकांची मुजोरी थांबत नाही. याबाबत प्रवाशांनी विभाग नियंत्रक नितीन मैंद यांच्याकडे आपली कैफियत मांडली असता मैंद यांनी संबंधित आगारप्रमुखांना लेखी आदेश दिले आहेत.नाशिकहून ओझर, पिंपळगावमार्गे पुढे जाणार्‍या बसेस पिंपळगाव बसस्थानकात न जाता उड्डाणपुलावरून परस्पर पुढे जात असल्याच्या तक्रारी वारंवार प्रवासी करीत आहेत. त्या अनुषंगाने मध्यवर्ती बसस्थानक व नवीन मध्यवर्ती बसस्थानकात चालक-वाहकांसाठी पिंपळगाव बसवंतच्या उड्डाणपुलावरून बसेस न नेता उड्डाणपुलाखालून नेण्यात याव्यात. तसेच, ओझर व पिंपळगाव बसवंत येथील प्रवाशांना घेण्यात यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. याबाबत प्रवासी तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे. असे असतानाही मुजोर चालक-वाहक विभाग नियंत्रकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे.