Thu, Jul 18, 2019 12:39होमपेज › Nashik › ‘कालिदास’ भाडेवाढीचा फेरविचार करणार

‘कालिदास’ भाडेवाढीचा फेरविचार करणार

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 07 2018 11:53PMनाशिक : प्रतिनिधी

महाकवी कालिदास कलामंदिराच्या भाडेवाढ प्रकरणी कलावंतांच्या भावनांचा आदर करून सर्वमान्य तोडगा काढण्याचे संकेत महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी नाट्य कलावंतांच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी (दि. 7) दिले. भाडेवाढीचा फेरविचार करून स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठवला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

महाकवी कालिदास कलामंदिराच्या भाडेवाढीमुळे कलावंतांमध्ये रोष निर्माण झाला होता. या प्रकरणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी मध्यस्थी करीत नाट्य कलावंतांची आयुक्‍त मुंढे यांच्याशी भेट घडवून आणली. शिष्टमंडळात ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, नाट्यलेखक दत्ता पाटील, दिग्दर्शक सचिन शिंदे, प्रकाशयोजनाकार विनोद राठोड, लक्ष्मण कोकणे व अभय ओझरकर यांचा समावेश होता. यावेळी मुंढे यांनी ‘कालिदास’ची भाडेवाढ व तांत्रिक त्रुटींबाबतचे मुद्दे समजावून घेतले. ठाणे, पुणे, मुंबईच्या तुलनेत कालिदासचे भाडे हे कलावंतांच्या आवाक्याबाहेरचे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. हौशी व प्रायोगिक कलावंतांसाठी भाडे ठरवताना व्यावसायिक निकष लावू नये, या मुद्यावरही आयुक्‍तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कालिदासच्या नूतनीकरणावर झालेला खर्च वसूल करण्याच्या हेतूने भाडेवाढ करण्यात आली हा गैरसमज असून, देखभालीच्या दृष्टीने भाडे वाढविल्याचे आयुक्‍तांनी स्पष्ट केले.

सर्व अडचणींवर तोडगा काढून त्या दूर केल्या जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. आ. देवयानी फरांदे यांनी व्यवहार्य तोडगा काढताना कलावंतांच्या भावनांचा विचार करावा, असे मत मांडले. त्यावर कलावंतांवर अन्याय करण्याची मनपाची भूमिका नसून, रास्त मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, लवकरच आपल्या अपेक्षा आणि सध्याचा निर्णय यावर तौलनिक विचार करून सकारात्मक मार्ग काढला जाईल. आपल्या सूचनांचे स्वागतच असेल. आंदोलनापेक्षा समन्वयातून हा प्रश्न सुटणे अपेक्षित आहे. हे नाट्यगृह कलावंत आणि नाट्य व कलाप्रेमींसाठी आहे. त्याचा त्यांना विनासायास लाभ व्हावा, अशी मनापासून इच्छा आहे. कलावंतांच्या मागण्यांचा विचार करून प्रस्ताव तयार स्थायी समितीकडे पाठवला जाईल, असे आयुक्‍त मुंढे यांनी सांगितले.

नाट्य परिषदेला बाजूला ठेवल्याचा आरोप

महाकवी कालिदास कलामंदिराच्या भाडेवाढीविरोधात रंगकर्मींनी दंड थोपटले असताना त्यांच्यातच फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रंगकर्मींच्या आंदोलनाला पक्षीय रंग न देण्याचा निर्णय झालेला असताना भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्याबरोबर नाट्य लेखक दत्ता पाटील, दिग्दर्शक सचिन शिंदे, ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, विनोद राठोड, अभय ओझरकर यांनी आयुक्‍तांची भेट घेतली. या बाबीत हेतूपुरस्सर नाट्य परिषदेच्या पदाधिकार्‍यांना दूर सारले गेल्याचा आरोप परिषदेचे उपाध्यक्ष शाहू खैरे यांनी केला आहे. रंगकर्मींमध्ये अशी फूट पडल्याने आंदोलनाची धारच बोथट झाल्याचेही त्यांनी सांगितले.