Mon, May 20, 2019 20:06होमपेज › Nashik › कालिदास कलामंदिराचे स्वातंत्र्यदिनी लोकार्पण

कालिदास कलामंदिराचे स्वातंत्र्यदिनी लोकार्पण

Published On: Aug 12 2018 1:02AM | Last Updated: Aug 12 2018 1:02AMनाशिक : प्रतिनिधी

नूतनीकरण होऊनही गेल्या काही दिवसांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेले महाकवी कालिदास कलामंदिर अखेर स्वातंत्र्यदिनी (दि. 15) खुले होणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाट्यगृहाचे लोकार्पण होणार असून, शहरातील रसिकांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. 

बुधवारी (दि. 15) सकाळी 11 वाजता कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. शहराच्या सांस्कृतिक घडामोडींचा केंद्रबिंदू असलेेल्या कालिदास कलामंदिराची प्रचंड दुरवस्था झाल्यानंतर अखेर गेल्या वर्षी त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले. स्मार्ट सिटी उपक्रमाअंतर्गत सुमारे सव्वानऊ कोटींचा निधी त्यासाठी मंजूर करण्यात आला. सुमारे वर्षभरानंतर नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले खरे. मात्र, त्याचे उद्घाटन होत नसल्याने यासंदर्भातील संभ्रम वाढला होता.

काम पूर्ण होऊनही उद्घाटनाचे घोडे नेमके कशासाठी अडले, असा सवाल कलावंतांमधून उपस्थित केला जात होता.  गेल्या महिन्यात महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी नाट्यगृहात शिक्षकांची कार्यशाळा घेऊन नव्या सुविधांची चाचपणीही केली होती. त्यानंतर तरी नाट्यगृहाचे उद्घाटन होईल, अशी कलावंतांना अपेक्षा होती. मात्र, त्यावर अनेक दिवस उलटूनही नाट्यगृहाच्या उद्घाटनाची चिन्हे दिसत नसल्याने शहरातील कलावंत व रसिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. शहरात व्यावसायिक नाटकांचे प्रयोग जवळपास थांबल्याने नाट्यरसिक नाटकांपासून वंचित राहत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कालिदास’चे उद्घाटन दिमाखात व्हावे, अशी राजकीय मंडळींची इच्छा असून, मुख्यमंत्री व्यस्त असल्याने नाट्यगृहाचे उद्घाटन खोळंबले असल्याची चर्चा होती. मात्र, आता स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्तेच कलामंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे सूत्रांकडून कळते. पालकमंत्री ध्वजवंदन सोहळ्यासाठी नाशिकला येणार असल्याने याच दिवशी ‘कालिदास’च्या लोकार्पणाचा कार्यक्रम ठेवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.