Wed, Jul 24, 2019 08:27होमपेज › Nashik › रासाकाची चिमणी पुन्हा पेटणार!

रासाकाची चिमणी पुन्हा पेटणार!

Published On: Jan 16 2018 2:14AM | Last Updated: Jan 16 2018 1:27AM

बुकमार्क करा
काकासाहेबनगर : वार्ताहर

रासाका अर्थात कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचा रविवारी (दि.14) मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर सकाळी अकरा वाजता शीला अतुल शुगरचे  अध्यक्ष गोपाल आरकडे व शीला आरकडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. रासाकाचा गळीत हंगाम सुरू होतो की नाही, या प्रश्‍नावर यानिमित्ताने पडदा पडला आणि पुन्हा एकदा ‘दिस  जातील, दिस येतील, भोग सरल...’ या गीताचा प्रत्यय आला. सर्वसामान्य कामगारास विश्‍वास बसत नव्हता की, खरोखर रासाकाचे कामकाज सुरू होतेय. काही दिवसांपासून रासाकाबाबत कथित लोकांनी जो प्रकार केला त्यामुळे कोणीच रासाका सुरू करण्यासाठी पुढे यायला तयार नव्हते.

परंतु, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व आमदार अनिल कदम यांच्या पुढाकाराने व प्रयत्नाने पैठण संत एकनाथ सहकारी साखर कारखाना शीला अतुल शुगरचे अध्यक्ष गोपाल आरकडे यांनी हे शिवधनुष्य उचलले. रासाका कार्यस्थळावर येत कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून रासाका प्रवेशद्वारावरच सभा घेत कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, ऊसतोडणी मजूर, ठेकेदार, व्यावसायिक आदी घटक वर्गास संबोधित केले. ते म्हणाले, रासाका कामगार, ऊस उत्पादक व सभासदांच्या विश्‍वासाला पात्र ठरत सर्वांच्या सहकार्याने कर्मवीरांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या या संस्थेला अच्छे दिन आणून परिसराचे थांबलेले अर्थकारण सुरु करण्यासाठी शीला अतुल शुगर संस्था कटिबद्ध राहील.

आश्‍वासन देण्यापेक्षा आधी काम करून दाखविण्याची मग बोलण्याची आमची पद्धत आहे. तेव्हा कामगार वर्गाचे वेतन, ऊस उत्पादकांचे पैसे, ऊसतोडणी व वाहतूकदारांचे पैसे हे आम्ही बोलण्यापेक्षा आमच्या कामकाजातून येत्या काळात तुम्हाला दिसेल. तेव्हा हाक आमची साथ तुमची देत कर्मवीरांचे स्वप्न पूर्ण करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. व्यवस्थापकीय संचालक पी. आर. जाधव म्हणाले, कामगारांच्या वतीने 26 जानेवारी ते 27 जानेवारीपर्यंत रासाकाचा गळीत हंगाम सुरू केला जाईल. त्यासाठी कामगारांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी छत्रपती संभाजीराजे साखर उद्योगाचे कार्यकारी संचालक दिगंबर बडदे, शीला अतुल शुगरचे सर्व संचालक, स्माईल संस्थेचे संस्थापक अजिंक्य वाघ, रानवड सोसायटी सभापती सोपानराव वाघ, ज्येष्ठ सभासद, जयवंतराव वाघ, रघुनाथ कोल्हे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, रासाकाचे माजी कामगार संचालक संपतराव निकम, कामगार संघटनेचे उत्तम रायते, मधुकर आहेर, अशोक कुशारे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुधाकर मोगल, हंगामी कामगार पतसंस्थेचे माजी अध्यक्ष शिवराम रसाळ, मोतीराम वाघ, सुरेश वाढवणे, विश्‍वनाथ जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.