Mon, Mar 25, 2019 09:09होमपेज › Nashik › त्र्यंबकच्या कैलास पतसंस्थेच्या बेपत्ता कर्मचार्‍याचा मालेगावी मृत्यू

त्र्यंबकच्या कैलास पतसंस्थेच्या बेपत्ता कर्मचार्‍याचा मालेगावी मृत्यू

Published On: Aug 10 2018 12:58AM | Last Updated: Aug 10 2018 12:00AMमालेगाव : प्रतिनिधी

लाखोंचा कथित गैरव्यवहार झालेल्या त्र्यंबकेश्‍वर येथील कैलास नागरी सहकारी पतसंस्थेतील बेपत्ता कर्मचारी अनिल ईश्‍वर पाटील (40) यांचा मालेगावात गुरुवारी मृत्यू झाल्याने मूळ प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

पाटील तीन दिवसांपासून बेपत्ता होते. तो गुरुवारी नाशिक येथून एमएच-15-ई-7346 या इंडिका कारने मालेगावला आले. शहर गाठल्यानंतर चालकाने कुठे जायचे, असे विचारले असता, पाटील यांनी प्रथम मालेगाव कॅम्पमध्ये गाडी घेण्यास सांगितले. परंतु, ते तेथे उतरले नाही. तेथून बसस्थानकात सोडण्याची सूचना चालकाला केली. त्यानुसार कॅम्प रस्त्याने मोसम पूलकडे येताना चालकाला छावणी पोलीस ठाणे दिसले. पाटीलचे अजब वागणे पाहून चालकाने गाडी ‘छावणी’जवळ थांबविली. चालकाने प्रकार कथन केल्यावर ड्यूटीवरील अधिकार्‍याने पाटीलची विचारपूस केली. त्याच्या असबंध उत्तर व हालचालीचा अंदाज घेत पोलिसांनी चालकाला त्याला दवाखान्यात घेऊन जाण्याची सूचना केली. त्याप्रमाणे एलआयसी कॉर्नरवरील आरोग्य संपदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. कापडणीस यांनी तपासणी केली असता पाटीलचे पल्स कमी असल्याचे निष्पन्‍न झाले.

आपत्कालीन उपचारपद्धती उपलब्ध नसल्याने रुग्णाला तत्काळ प्रयास हॉस्पिटलला वर्ग करण्याचे सांगण्यात आले. प्रयासमध्ये पोहोचण्यापूर्वीच पाटील यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासणी करून घोषित केले. मृतदेह सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. विष्णू महाजन यांनी दिलेल्या माहितीवरून छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे यांनी दिली. अतिप्रमाणात झोपेच्या अथवा तत्सम गोळ्या घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

कोण आहे पाटील? : पाटील हे त्र्यंबकच्या कैलास नागरी पतसंस्थेतील कर्मचारी आहे. मंगळवारी या पतसंस्थेचा ताळेबंद तपासणीत 55 ते 60 लाख रुपयांचा हिशेब लागत नसल्याचे उघड झाले. संचालक मंडळाने महत्त्वाची कागदपत्रे तपासल्यानंतर लाखोंचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. तेव्हापासून पाटील गायब होते.