Thu, Apr 25, 2019 21:54होमपेज › Nashik › अपहार प्रकरणी कैलास मोतेंवर गुन्हा

अपहार प्रकरणी कैलास मोतेंवर गुन्हा

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 11:26PMनाशिक : प्रतिनिधी

एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असताना कैलास परशराम मोते यांनी आकाशदीप सोसायटीच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपहार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद नामदेव पाटील (36, रा. काठे गल्ली) यांनी फिर्याद दाखल केली आहे. 

राज्याच्या मृद जलसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संचालक पदावर कैलास मोते हे सध्या कार्यरत आहेत. 2005-2008 या काळात एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात प्रकल्प संचालक म्हणून मोते यांची नेमणूक होती. या कार्यकाळात आदिवासी विकास विभागात 2005-06 मध्ये आकाशदीप सोसायटीच्या संगनमताने लघु उपसा जलसिंचन योजनेचा 16 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका मोते यांच्यावर आहे. त्याचप्रमाणे 2005-2006 या कालावधीत पाईप खरेदी करण्याच्या नावाखाली 92 लाभार्थ्यांचे दोन हजार 576 पाइपचे 13 लाख 65 हजार 280 रुपयांचा अपहार केला. त्यानंतर 2007-08 मध्ये 505 लाभार्थ्यांच्या 15 हजार पाइपांचे 74 लाख 99 हजार 500 रुपये अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रमाणे मोते यांनी एकूण एक कोटी चार लाख 64 हजार 780 रुपयांचा अपहार करीत, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आदिवासी विकास विभागातील घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण राज्यभरात असून, यात 200 हून अधिक अधिकारी अडकलेले आहेत. गुन्हे दाखल करू नये म्हणून संबंधितांनी न्यायालयाची दारेही ठोठावली होती. आदिवासी विकास विभागात तर मोते यांच्या बाजूने कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलनही पुकारले होते. अखेर आता मोते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

गावित यांच्या गैरव्यवहाराशी संबंध

तत्कालीन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कार्यकाळात आदिवासी विकास विभागातील हे प्रकरण आहे. 2014 साली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार झाल्यानंतर यात चौकशी करण्यात आली. निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या समितीने चौकशी केल्यानंतर डॉ. गावित यांच्यासह आदिवासी विकास विभागाच्या अधिकार्‍यांवर ठपका ठेवण्यात आला होता. याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखा करीत आहेत. 

मोते यांनी भूषविलेली पदे

शहादा येथे उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून सेवा बजावल्यानंतर उपसंचालक पदावर त्यांनी काम केले. त्यानंतर ते आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. नाशिक कृषी अधीक्षक अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. या पदावरून कृषी सहसंचालक पुणे येथे पदोन्नतीने रुजू झाले. अवघ्या वर्षभरातच विभागीय कृषी सहसंचालक म्हणून ते नाशिकला परत आले. सहसंचालक पदावरून ते राज्याच्या मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संचालक म्हणून पदोन्नतीने मुंबई येथे कार्यरत आहेत.