Tue, Apr 23, 2019 19:55होमपेज › Nashik › शेतकरी संपासाठी आजचा दिवस निर्णायक

शेतकरी संपासाठी आजचा दिवस निर्णायक

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 12:40AMपंचवटी : वार्ताहर 

शेतकर्‍यांचा संप गुरुवारपासून (दि. 7) तीव्र होण्याच्या शक्यतेमुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाल्याच्या आवकेत वाढ झाली असून, भाव मात्र स्थिर आहेत.  बंदबाबत कोणतेही पत्र प्राप्त झाले नसल्याने गुरुवारी बाजार समितीचे कामकाज सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, संपाबाबत गुरुवारचा दिवस निर्णायक ठरणार असून, या दिवशीच्या घडामोडींवरच संपाचे भवितव्य अवलंबून आहे.

शेतकरी आंदोलनाची धार दि. 7 जूनपासून तीव्र करण्याचा व बाजार समित्या बंद ठेवण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. भाजीपाल्याचे नुकसान होण्याच्या धास्तीने बुधवारी (दि. 6) नाशिक बाजार समितीमध्ये   भाजीपाला विक्रीसाठी आणला. त्यामुळे समितीत अक्षरश: पाय ठेवण्यासही जागा शिल्लक नव्हती. दरम्यान, बाजार समितीमध्ये दोडक्याची अवघी 3 क्विंटल आवक झाल्याने त्याला सरासरी 6 हजार रुपये प्रतिक्‍विंटल भाव मिळाला. त्यामुळे शेतकर्‍यांनी आनंद व्यक्‍त केला. गुरुवारीही बाजार समिती सुरू राहणार असून, शेतकर्‍यांनी भाजीपाला घेऊन यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.