Thu, Apr 25, 2019 13:27होमपेज › Nashik › जीप-आयशरच्या भीषण अपघातात बारा जखमी

जीप-आयशरच्या भीषण अपघातात बारा जखमी

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 10:41PMचांदवड : वार्ताहर

चांदवड तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव टप्पा शिवारातील स्वागत हॉटेलसमोर काळी-पिवळी जीपने रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या आयशरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात जीपमधील बारा प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

चांदवड तालुक्यातील आडगाव टप्पा येथील स्वागत हॉटेलसमोरील मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडून मालेगावकडे भरधाव वेगाने जाणारी काळी पिवळी जीप (क्र. एम.एच.-16-बी.-6945) वेगात असल्याने गाडी चालकाचे नियंत्रण सुटले. त्याने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या आयशरला जोरदार धडक दिली. या अपघातात काळी -पिवळी जीपचा पुढच्या बाजूचा पूर्णतः चक्‍काचूर झाला होता. हा अपघात बुधवारी (दि.5) सकाळी साडेदहा वाजता झाला. जीपचालक छोटू पाटील (45, सिडको) व मंगेश जाधव (35) हे दोघे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. 

तर गोविंदा संभाजी गवाळे (30), धनंजय गोविंद गवाळे (11), संतोष दगडू खैरणार (45, सातपूर, नाशिक), सोनल बाळकृष्ण खैरणार (24), अनुराग खैरणार, अनुसयाबाई पोपट ठोंबरे (धोडांबे, चांदवड), विश्‍वास रामभाऊ सोनवणे (42), अनिता विश्‍वास सोनवणे (40, दोघेही रा. नाशिक), समीर देशपांडे (30), चेतन शिवाजी गायकवाड (40, शिवाजी चौक नाशिक) आदींना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत.

अपघाताची माहिती मिळताच चांदवडचे उपपोलीस निरीक्षक कैलास चौधरी, मुज्जमील देशमुख, जे. डी. मोरे, बी. एच. चव्हाण, चंद्रकांत निकम आदींनी पंचनामा केला. या प्रकरणी चांदवड पोलिसात जीप चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिसरात नेहमीच अपघात घडत असल्याने ठिकठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यात पडलेले खड्डी तत्काळ बुजविण्याची मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.