Wed, Apr 24, 2019 07:30होमपेज › Nashik › देशाला मोदी नावाचे ग्रहण : जयंत पाटील

देशाला मोदी नावाचे ग्रहण : जयंत पाटील

Published On: Feb 17 2018 2:08PM | Last Updated: Feb 17 2018 2:09PMनाशिक : पुढारी ऑनलाईन 

पंतप्रधानांसोबत डावोसला जाऊन फोटो काढणारा नीरव मोदी असो अथवा विजय मल्ल्या, सरकारच्या नाकाखालून हे लोकं देशातला पैसा घेऊन फरार होत आहेत. मोदी नावाचे ग्रहण देशाला लागले आहे, असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले. तसेच सरकार काय झोपा काढतंय का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्च्यात ते बोलत होते. 

केंद्र सरकारचा ड्रिम प्रोजेक्ट असणाऱ्या बुलेट ट्रेनवरही यावेळी जयंत पाटील यांनी निशाणा साधला. ‘या सरकारने महाराष्ट्राला कर्जात लोटलं आहे. हा कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांसाठीचा नाही तर बुलेट ट्रेनसाठीचा आहे, असा आरोप त्यांनी केला. पेट्रोल-डिझेल व इतर सर्वच बाबतीत देशात महागाई वाढली असून या सरकारकडे जनतेला देण्यासाठी काहीच उरलेले नाही, असेही ते म्हणाले. 

सरकारकडे नागरिकांची भूक भागवण्यासाठी नव्हे तर जाहीरातीसाठी पैसा

मोदी सरकारकडे लोकांची भूक भागवण्यासाठी पैसे नाहीत पण जाहिरातींसाठी अमाप पैसा आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या सभेत केली. आंतरराष्ट्रीय फूड इंडेक्सनुसार सध्या भारत गेल्या ७० वर्षांचा विचार करता अन्नधान्याच्या उत्पादनात सर्वांत मागे फेकला गेला आहे. पाकिस्तानच्याही मागे आपला देश गेला आहे, असे ते म्हणाले. 

मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या विषयी बोलताना, ‘नीरव मोदी हजारो कोटी घेऊन पळून गेला. दुसरीकडे मात्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे धर्मा पाटील या वयोवृद्ध शेतकऱ्याला जीव गमवावा लागला, त्यांच्या कष्टाच्या जमिनीची तुटपुंजी रक्कमही सरकारला देता आली नाही, असेही आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.