Sat, Mar 23, 2019 16:24होमपेज › Nashik › जातपंचायतीचा जाच सुरूच

जातपंचायतीचा जाच सुरूच

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 14 2018 12:56AMमालेगाव : प्रतिनिधी

राज्यात सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा लागू होऊनही जातपंचायतींचा जाच कमी होण्याची चिन्हे नाहीत. एकाच जातीत परंतु कूळ परंपरा तोडून प्रेमविवाह करणार्‍या दाम्पत्याला बागलाण तालुक्यातील मळगाव येथील वैदू समाजाच्या जातपंचायतीने वाळीत टाकल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पंचांनी सामाजिक दबाव टाकत मुलाला कर्करोगग्रस्त पित्याला भेटण्यापासून वंचित ठेवल्याची गंभीर बाब पुढे आली असून, या प्रकरणी संबंधित दाम्पत्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

सुनंदा (20) व दिनेश गोविंद पवार (23) अशी या पीडितांची नावे आहेत. या दाम्पत्याने मालेगावातील महिला समुपदेशन केंद्रात दाद मागितली आहे. दिनेश हा मूळ बागलाण तालुक्यातील मळगाव (ति.) येथील रहिवासी आहे. त्याचे एका विवाह सोहळ्यानिमित्त म्हसरूळ येथे (नाशिक) जाणे झाले. तेथे त्याची सुनंदाशी ओळख होऊन प्रेम जमले. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. दोघे हिंदू-वैदू समाजाचे असल्याने  विरोध होणार नाही, अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु, सुनंदा हटकर, तर दिनेश हा पवार असल्याने दोघांचे कूळ भिन्न असल्याने त्यांना विरोध सुरू झाला.

मात्र, त्याला न जुमानता दोघांनी 2 जानेवारी 2018 रोजी लग्न केले. त्यामुळे संतापलेल्या जातपंचायतीने दोघांना वाळीत टाकले. पवार व हटकर कुटुंबीयांनी मात्र लग्नाला मान्यता दिली. परंतु, पंच निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी पंचायत बसवत दोघा कुटुंबांना समाजात राहायचे असल्यास या दोघांशी संबंध तोडण्याचा आदेश दिला. चार वेळा पंचायत बसवून नवनवीन फतवे काढण्यात आले. त्यातून मुलाकडून एक लाख व मुलीच्या पालकांकडून 20 हजार रुपये घेण्यात आले. तरी या बहिष्कारमुक्तीसाठी चार ते पाच लाख रुपयांची मागणी होत राहिली. ती पूर्ण करण्यास नकार दिल्याने वाळीत टाकल्याची कर्मकहाणी पवार दाम्पत्याने पत्रकारांशी बोलताना कथन केली. दरम्यान, वडिलांना कर्करोग होऊन त्यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना भेटण्यासही पंचांनी बंदी घातली आहे. ती मोडल्यास संपूर्ण पवार कुटुंबालाच वाळीत टाकण्याची धमकी दिल्याने नवदाम्पत्य हतबल झाले आहे.

पाणी तोडले, आप्तांना भेटीगाठीची बंदी, लग्नसोहळ्यात प्रवेश नाकारला गेला. आता समाजात परत येण्यासाठी ‘वेगळे व्हा अन्यथा दंड भरा’ असा पर्याय समोर ठेवल्याने समाजात सन्मानाने, सुरक्षित जगण्याच्या न्याय्य मागणीसाठी पवार दाम्पत्य महिला समुपदेशन केंद्रात येथील पोहोचले आहे. त्यांची समस्या जाणून घेत समुपदेशकांनी त्यांना सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे मार्गदर्शन केले. यानुसार या प्रकरणी नात्यातील पंचांसह सहा जणांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

पीडित दाम्पत्य आत्महत्येच्या मानसिकतेत

दिनेश पवार हा मालेगावातील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानात काम करीत होता. लग्नानंतर घरचे राजी झाल्याने तो मळगावला परतला होता. परंतु, जातपंचायत घरच्यांपासून दूर ठेवत असल्याने गावातच एक खोली करून ते संसार करीत आहेत. मिळेल ते काम करून कुटुंबाचा गाडा ओढतानाच पंचांकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यांच्याशी कुणी बोलत नाही, कोणी बोलले तर त्यालाही पंच बहिष्काराची धमकी देतात. त्यामुळे पवार दाम्पत्य एकाकी पडले आहे. प्रशासनाने जातपंचायतीच्या जाचातून मुक्ती न दिल्यास जीवन संपविण्याशिवाय पर्याय नसल्याचेही या दाम्पत्याने सांगितले.