Tue, Jul 16, 2019 09:40होमपेज › Nashik › आमदार बच्चू कडू यांचा मनपात पुन्हा ‘प्रहार’ 

आमदार बच्चू कडू यांचा मनपात पुन्हा ‘प्रहार’ 

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 1:10AMनाशिक : प्रतिनिधी

अमरावतीच्या अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चूकडू यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमध्ये मंगळवारी (दि.24) ‘जनता दरबार’ होणार आहे. या कार्यक्रमानंतर आ. कडू हे महापालिकेेवर धडक देणार असून, दिव्यांगांसाठी राखीव निधी अद्याप खर्च न केल्यामुळे मनपात ‘कडू प्रहार’ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  यावेळी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे आणि आ. कडू यांचा सामना होण्याची शक्यता आहे. 

दिव्यांग बांधवांच्या राखीव निधी खर्चावरून गेल्यावर्षी 24 जुलै रोजी आ. कडू यांनी नाशिक महापालिकेवर धडक देत आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर ‘कडू प्रहार’ केला होता. तेव्हापासून मनपातील अधिकार्‍यांनीही चांगलाच धसका घेतला होता. त्यामुळेच दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला 5 टक्के निधी खर्च करण्यासाठी तत्कालीन आयुक्त कृष्णा यांनी विविध योजना आखल्या. दरम्यानच्या काळात कृष्णा यांची बदली होऊन तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच मुंढे यांनी आपल्या धडाकेबाज कामगिरीचा करिश्मा दाखवायला सुरूवात केली. मात्र, अपंगांसाठी राखीव निधीतून आखलेल्या योजनांना त्यांनी कात्री लावली. त्यामुळे पेन्शन योजनेसाठी अनेक दिव्यांगांनी अर्ज भरूनही अद्याप त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. दरम्यान, आयुक्त मुंढे यांनी परवाच्या (दि.19) महासभेत दिव्यांगांच्या पेन्शनसह विविध योजनांचे प्रस्ताव मंजूर करून घेतले खरे; मात्र आ. कडू येणार, याची चाहूल लागल्यामुळेच आयुक्त मुंढे यांनी प्रस्ताव महासभेपुढे ठेवल्याचे बोलले जात आहे. 

येत्या मंगळवारी (दि. 24) ‘त्या’ घटनेला बरोबर एक वर्ष होणार असून, याच तारखेला ‘प्रहार’च्या नाशिक जिल्हा शाखेने आ. कडू यांचा ‘जनता दरबार’ ठेवला आहे. पंचवटीतील शिवछत्रपती भवनमध्ये सकाळी 10 ते 5 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या, शासकीय कार्यालयांत प्रलंबित प्रश्‍न, रेंगाळलेली कामे, शिधापत्रिका, सरकारी रुग्णालय, वृद्ध व विधवा महिला पेन्शन, संजय गांधी व श्रावण बाळ योजना, खासगी शाळा फी वाढ, औद्योगिक कामगारांच्या समस्या, दिव्यांगांच्या योजना, माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक यांच्या तक्रारी, बँक कर्ज घेणे-वसुली, शेतकरी पीककर्ज आदी विषयांवर तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. नागरिकांनी आवश्यक पुराव्यांसह कागदपत्रे घेऊन उपस्थित रहावे, असे आवाहन ‘प्रहार’चे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तु बोडके, जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, प्रकाश चव्हाण, नितीन गवळी, जगन काकडे यांनी केले आहे. दरम्यान, दुसर्‍या जिल्ह्यातील आमदार इथे येऊन ‘जनता दरबार’ घेणार असल्याने स्थानिक आमदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

जनता दरबारासाठी येणार असून, नाशिककरांच्या समस्या जाणून घेणार आहे. दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला 5 टक्के निधी महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षभरात खर्च केला असेल तर महापालिकेत जाणार नाही. मात्र, हा निधी खर्च केला नसेल तर महापालिकेत जावेच लागेल.  - आ. बच्चू कडू, संस्थापक, ‘प्रहार’