Sun, Sep 23, 2018 09:49



होमपेज › Nashik › जप्त मिळकतींचे लिलाव स्थगित

जप्त मिळकतींचे लिलाव स्थगित

Published On: Feb 07 2018 1:38AM | Last Updated: Feb 06 2018 11:17PM



जळगाव : प्रतिनिधी

महापालिकेच्या थकीत घरपट्टी न भरणार्‍या 325 मिळकतधारकांच्या मालमत्तांचा लिलाव मंगळवारी (दि.6) रोजी करण्यात येणार होता. ही लिलाव प्रक्रिया महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सुरू करण्यात आली होती. मात्र,  सभागृहात काही जणांनी थकीत रक्कम दिली. इतरांनी मुदत देण्याची विनंती केली. त्यामुळे  अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी लिलाव स्थगित करुन 5 मार्चपर्यंत थकीत रकमा भरण्यासाठी मुदत दिली आहे. यामुळे सुमारे साडेचारशे थकबाकीदारांना दिलासा मिळाला आहे. महापालिकेची असलेली कर्जाची परतफेड, कर्मचार्‍यांंची देणी,  मक्तेदारांची प्रलंबित बिले असे अनेक आर्थिक देणे असल्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून पालिका प्रशासनाने थकीत मालमत्ताधारकांविरोधात धडक मोहीम राबवून वसुली केली आहे. यात थकबाकी असलेल्या 814 मालमत्तांना सील करून जप्ती करण्यात आली.

जप्ती कारवाईनंतर मोठ्या प्रमाणात 489 मिळकतधारकांनी घरपट्टीचा भरणा केला आहे. उर्वरीत 325 जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रीया मंगळवारी करण्यात येणार होती.  यासाठी पालिकेच्या दुसर्‍या मजल्यावर अपर आयुक्त राजेश कानडे, प्रभाग अधिकारी विलास सोनवणी,  संजय नेमाडे, सुशील साळुंखे व संजय पाटील यांच्या उपस्थितीत 325 मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतू, कबाकीदारांनी पैसे भरण्यासाठी मुदत द्यावी, पैसे भरण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. यासोबतच सुमारे 40 जणांनी थकबाकीचे धनादेश तर चार जणांनी रोख रकमेचा भरणा केला. त्यामुळे लिलाव 15 दिवसांसाठी स्थगित करण्यात आले.

या कालावधीत पैसे न भरल्यास 5 मार्चनंतर पुन्हा लिलाव करण्याचा इशाराही थकबकीदारांना देण्यात आला आहे. थकीत घरपट्टीधारकांच्या ज्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्या मालमत्तांच्या तुलनेत थकीत घरपट्टीच्या रक्कमा कमी असल्याने या मालमत्तांच्या लिलावासाठी जळगावातून अनेक जण उपस्थित राहिले होते. यानतंर पुढील ्थकबाकीदारांची यादी तयार करुन त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरु आहे.