Fri, Jul 03, 2020 02:42होमपेज › Nashik › जळगाव : लाच मागणारे पोलिस कर्मचारी सेवेतून बडतर्फ

जळगाव : लाच मागणारे पोलिस कर्मचारी सेवेतून बडतर्फ

Last Updated: May 29 2020 3:18PM
जळगाव : पुढारी वृत्तसेवा 

गांजाची केस दाखल न करण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच मागणारे सहाय्यक फौजदार बापूराव फकिरा भोसले व पोलिस कॉन्स्टेबल गोपाल गोरख बेलदार या दोघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, गांजाची केस दाखल करू नये, यासाठी सहाय्यक फौजदार बापूराव भोसले (वय ५२, रा. आमडदे, ता. भडगाव, ह. मु. चाळीसगाव) व कॉन्स्टेबल गोपाल बेलदार (वय ३१, रा. प्रभुकृष्णनगर, शेंदुर्णी, ता. जामनेर) या दोघांनी पंचासमक्ष १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ८ हजार रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत युवकाने एसीबीकडे तक्रार केली केल्यानंतर दोन्ही पोलिसांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.

वाचा- जळगावमधील बाधितांची संख्या ५७१ वर

एमआयडीसी पोलिस स्थानकात कार्यरत असणारे तत्कालीन निरीक्षक शिरसाठ आणि त्यांच्या सहकार्‍यांना अवैध दारू विक्रीत सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. या पाठोपाठ आता लाचखोर कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.