Fri, Apr 26, 2019 15:32होमपेज › Nashik › मुख्यमंत्री पेयजल योजनेत अखेर बाणगावचा समावेश

मुख्यमंत्री पेयजल योजनेत अखेर बाणगावचा समावेश

Published On: Jan 14 2018 2:16AM | Last Updated: Jan 14 2018 2:01AM

बुकमार्क करा
जळगाव बुद्रुक   : वार्ताहर

नांदगाव तालुक्यातील बाणगावचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश झाल्याने येथील पाण्याचे दुर्भिक्ष संपण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्‍त केले आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधींसह, अधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि.12) उशिरा बाणगाव बुद्रुकला भेट देत येथील पाणीव्यवस्थेची पाहणी केली. या संदर्भात दै. ‘पुढारी’ने 4 जानेवारीला सविस्तर वृत्त देत येथील समस्येवर प्रकाशझोत टाकला होता.

पिण्याचे पाणी सोडा, वापरण्याचे पाणीही वेळेवर मिळत नसल्याने बाणगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले होते. वीजपुरवठ्याचे रोहित्र नादुरुस्त झाल्याने हा पाणीपुरवठा खंडित झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, वापरण्याचे पाणीही अत्यंत घाणेरडे असल्याचे ग्रामस्थांनी दाखवून देत संताप व्यक्‍त केला होता. या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल सात दिवसांनंतर नांदगाव पंचायत समितीचे उपसभापती सुभाष कुटे, तहसीलदार चंद्रकांत देवगुणे, गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब हिरे, यांनी सरपंच संजय फणसे यांच्यासह या पाणीपुरवठा योजनेची पाहणी करत अत्यंत दूषित पाण्याबद्दल चिंता व्यक्‍त केली. यावेळी उपस्थित उपसभापतींनी तत्काळ जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दूरध्वनीवरून सद्यस्थिती कथन करत गावासाठी मंजूर केलेल्या मुख्यमंत्री पेयजल योजनेला लवकरात लवकर गती द्यावी, अशी आग्रहाची मागणी केली.

बाणगावचा जलयुक्‍त गाव योजनेत समावेश झाल्याने या गावाला टँकरने पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने विहीर अधिग्रहणचा मुद्दा देवगुणे यांनी मांडला. यावेळी माजी सरपंच मोहन कवडे, कैलास कवडे, प्रभाकर कवडे, ग्रामसेवक सुनील मोकळ, तलाठी रवींद्र लोंढे, सजन कवडे, शांताराम कवडे, अशोक पवार, किशोर देवकर, रवी कवडे, शिवदास कवडे व ग्रामस्थ उपस्थित होते.