Sun, May 26, 2019 09:32होमपेज › Nashik › मराठा, मुस्लिम आरक्षणासाठी गोदापात्रात जलसमाधी आंदोलन

मराठा, मुस्लिम आरक्षणासाठी गोदापात्रात जलसमाधी आंदोलन

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 11:10PMनाशिक : प्रतिनिधी

मराठा आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा निर्णय सरकार घेत नसल्याच्या निषेधार्थ स्वातंत्र्यदिनी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडतर्फे गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अटक केली होती.

उच्च न्यायालयाने मुस्लिम आरक्षणाला मान्यता दिली आहे. मात्र, धार्मिक द्वेष ठेवून युती सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण नाकारत आहे. आगामी काळात तातडीने मुस्लिम व मराठा समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यकर्ते होळकर पुलावरून नदीपात्रात उड्या मारून बलिदान देतील असा इशारा मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष अजीज पठाण यांनी यावेळी दिला. तर मराठा सेवा संघप्रणीत जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष माधुरी भदाणे यांनी मुस्लिम व मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध झाले आहे. मात्र, सरकार मागास आयोगाच्या निर्णयाच्या पडद्याआड लपून चालढकल करत आहे. 

अनेकांनी आरक्षणासाठी बलिदान दिले ही गोष्ट शासनाने समजून घ्यावी अन्यथा किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला. दरम्यान, गोदावरी नदीपात्रात पाण्याचा जोर मोठ्या प्रमाणात असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मात्र, आंदोलकांनी जिवाची पर्वा न करता नदीपात्रात उड्या मारल्याने एकच धावपळ उडाली. यावेळी सुरक्षारक्षक तैनात असल्याने दुर्घटना टळली.