Mon, Apr 22, 2019 03:48होमपेज › Nashik › शहरापेक्षा ग्रामीण भागात मराठीचा जागर

शहरापेक्षा ग्रामीण भागात मराठीचा जागर

Published On: Jul 21 2018 1:32AM | Last Updated: Jul 21 2018 12:09AMनाशिक : प्रतिनिधी

आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकीकडे शहरातील पालक इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील लोकांनी मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पाठ फिरवून मराठीवरील प्रेम कृतीतून सिद्ध केले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या जागांसाठी ग्रामीण भागातून विद्यार्थीच मिळाले नसल्याचे समोर आले. बर्‍याचशा पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांवर विश्‍वास टाकून पाल्याचा याच शाळांमध्ये प्रवेश घेतल्याचा दावा केला आहे.

अधिनियमानुसार जिल्ह्यातील एकूण 466 शाळांमध्ये 6,589 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. या तुलनेत प्राप्त अर्जांची संख्या एकूण 11,118 एवढी असल्याने लॉटरी काढून प्रवेश देण्यात आला. पहिल्या फेरीत 3,001 विद्यार्थ्यांना लॉटरी लागली त्यापैकी 2,184 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. दुसर्‍या फेरीत 1,902 विद्यार्थ्यांपैकी 1,198 तर तिसर्‍या फेरीत 1,694 पैकी 1,071 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. म्हणजे, प्राप्त अर्जांपैकी 6,597 विद्यार्थ्यांना लॉटरी लागली आणि एकूण 4,453 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. सद्यस्थितीत अर्ज केलेल्यांपैकी 4,521 विद्यार्थी आणि 2,136 जागा रिक्त आहेत. जे विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत, त्यांनी शहरातील नामांकित शाळांसाठीच अर्ज केले असून, या शाळांमधील जागा पूर्णपणे भरल्या गेल्या असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. म्हणजे, लॉटरी काढली तरी या विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या शाळांमध्ये प्रवेश मिळणे शक्य नाही.

दुसरीकडे ज्या जागा रिक्त आहेत, त्या ग्रामीण भागातील शाळांमधील असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागातील पालकांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पाठ फिरवून आपल्या पाल्याचा मराठी माध्यमाच्या त्यातही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच प्रवेश घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये डीएड पदवीधारक शिक्षक असण्याविषयीच साशंकता आहे. तसेच भौतिक सुविधांचाही अभाव असल्यानेच ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांविषयी आकर्षण नसल्याचे सांगण्यात आले. म्हणजे, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील पालकांनीच इंग्रजी शाळांची खरी मेख ओळखून मराठी माध्यमांच्या शाळांना जवळ केले आहे.