Thu, Nov 15, 2018 03:45होमपेज › Nashik › दोनशे, पन्नासच्या नवीन नोटा नाशिककरांसाठी दुर्लभच!

दोनशे, पन्नासच्या नवीन नोटा नाशिककरांसाठी दुर्लभच!

Published On: Jan 30 2018 1:52AM | Last Updated: Jan 30 2018 12:59AMनाशिक : प्रतिनिधी

केंद्र सरकारने गतवर्षी गणेशोत्सवात 200 आणि 50 रुपयांची नवी नोट चलनात आणली. परंतु, सहा महिन्यानंतरही जिल्ह्यातील बँकांमध्ये या नोटा हव्या तेवढ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे या दोन्ही नोटा आजही नाशिककरांसाठी दुर्लभच ठरल्या आहेत. 

भ्रष्टाचाराला लगाम घालतानाच  बाजारात आर्थिक स्थिरता यावी, या उद्देशाने केंद्र सरकारने गतवर्षी 200 व 50 रुपयांची नोट चलनात आणली. कमी वेळेत या नोटा बाजारात उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासनही सरकारने दिले होते. परंतु, आजही नाशिक शहर व जिल्ह्यात या नोटा म्हणाव्या तेवढ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाही. दिवसाकाठी जिल्ह्यात कमीत कमी 90 ते 95 कोटींची आर्थिक उलाढाल होत असताना केवळ 10 ते 15 टक्के या नव्या नोटांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे सहा महिन्यानंतरही जिल्हावासीयांसाठी या दुर्मीळच ठरल्या आहेत.

200 व 50 रुपयांची नोटा एकीकडे नागरिकांसाठी दुर्लभ असतानाच दोन हजारांच्या नोटाही बाजारातून गायब झाल्याचे चित्र आहे. 

रिकॅलिब्रेशन ठरणार डोकेदुखी

दोनशेच्या नोटेचा आकार बघता ती एटीएम यंत्रांमध्ये उपलब्ध करून देणे बँकांना सध्या तरी शक्य नाही. त्यामुळेच एटीएममधून ही नोट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व एटीएमचे रिकॅलिब्रेशन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.  200 रुपयांच्या नव्या नोटेसाठी या सर्व एटीएमचे रिकॅलिब्रेशन करायचे म्हटल्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. 

10 रुपयांच्या नाण्यांची सक्ती

बँक खात्यामधून पैसे काढण्यासाठी बँकेत जाणार्‍या नागरिकांच्या माथी बँक प्रशासन 10 रुपयांची नाणी  मारत आहेत. पनाणी स्वीकारली तरच रक्कम दिली जाईल, असा तोंडी फतवा बँकांकडून राबविला जात आहे. मात्र, एवढी नाणी सांभाळायची कशी असे संकट नागरिकांसमोर उभे ठाकत आहे.