होमपेज › Nashik › डिजिटल साहित्यात अद्याप गांभीर्य नाही

डिजिटल साहित्यात अद्याप गांभीर्य नाही

Published On: Feb 27 2018 9:11AM | Last Updated: Feb 27 2018 9:11AMमुलाखत : सुदीप गुजराथी

आज मराठी राजभाषा दिन. सोशल मीडिया व संगणकाच्या वाढत्या प्रभावामुळे आता पुढचे युग डिजिटल मराठीचे असण्याची चिन्हे आहेत. राज्य शासनानेही शासकीय कार्यालयांना डिजिटल मराठी व युनिकोडचा वापर वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर बडोदा येथे झालेल्या 91 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्याशी डिजिटल मराठी व अन्य मुद्यांवर साधलेला हा संवाद...

> सोशल मीडिया व अन्य कागदबाह्य माध्यमांतून पुढे येणारे साहित्य कितपत गांभीर्याने घ्यायला हवे? ई-बुक व एकूणच डिजिटल साहित्याबद्दल काय मत?
- सोशल मीडिया व डिजिटल साहित्य आता बर्‍यापैकी प्रस्थापित झाले आहे. तरुण मंडळीही त्याद्वारे मराठीतून व्यक्‍त होत आहे. खास साहित्य, कवितेला वाहिलेले अनेक चांगले व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार झाले आहेत. त्यावर साहित्याला प्रतिसादही मिळतो आहे. हा प्रवास चांगला असला, तरी आजही 90 टक्के साहित्य फॉरव्हर्डेड असते. एकच मजकूर 10 ग्रुप्समध्ये शेअर केला जातो. त्यावरच्या एकूण साहित्यापैकी अवघे 5 ते 10 टक्के साहित्यच दखल घेण्याजोगे असते. त्यामुळे सोशल मीडिया हे साधन प्रभावी असले, तरी त्यावरचे साहित्य अद्यापही गांभीर्याने घेता येणार नाही. त्यावरच्या कविता तर अनेकदा इतक्या सामान्य दर्जाच्या असतात की, त्या वाचाव्याशाही वाटत नाहीत. अर्थात, डिजिटल माध्यमातील सारे काही वाईटच असते, असेही नाही. ‘अक्षरनामा’सारख्या काही वेबपोर्टल्स व अ‍ॅप्सवर दर्जेदार मजकूर असतो. मात्र, अशा पोर्टल्सची संख्या खूप कमी आहे. सोशल मीडिया व डिजिटल माध्यमांत दर्जेदार साहित्याचे प्रमाण वाढायला हवे. लोकांना मराठी वाचावेसे वाटणे, ही समाधानाची बाब आहे. मात्र, या माध्यमावरील साहित्याची ही सुरुवात म्हणावी लागेल. 

ई-बुक हीदेखील काळाची गरज आहे. तरी त्यांचेही प्रमाण फार नाही. बहुतांश मराठी प्रकाशकांनी आजही त्याचे महत्त्व ओळखलेले नाही. ते युनिकोडचा वापर करताना दिसत नाहीत. काही मोजके प्रकाशक त्यांच्या पुस्तकांच्या ई आवृत्त्या काढतात; मात्र त्यांचा हवा तेवढा खप होत नाही. त्यासाठी ई-बुकचा प्रसार-प्रचार होणे गरजेचे आहे. लोकांनी वाचणे गरजेचे आहे. त्यासाठी माध्यम महत्त्वाचे नाही. त्यामुळे आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ विवेक सावंत, माधव गाडगीळ आदींची मदत घेऊन मी प्रकाशकांना ई-बुक उपलब्ध करून देण्याची विनंती करणार आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देण्याचाही विचार आहे. 

> आता सोशल मीडियामुळे साहित्यावरील सर्व मर्यादा हटल्या आहेत. पूर्वी साहित्याला प्रकाशक, संपादक, मुद्रितशोधक वगैरेंच्या चाळण्या लागत. आता मात्र लेखकाचे साहित्य सोशल मीडियावरून थेट लोकांपर्यंत पोहोचते. ते अशुद्ध असते. अनेकदा त्यात ‘फॉरव्हर्डले’, ‘डिलिटले’ अशी शब्दांची सरमिसळही होऊ लागली आहे...
- साहित्य ही बोलीभाषा नव्हे. बोलीभाषेत सारे काही क्षम्य असते. मात्र, वाचकांपर्यंत जाणारे साहित्य हे शुद्ध व निर्दोषच असायला हवे. त्यात असल्या नव्या शब्दांची भर घालू नये. शब्द तयार करण्यासाठीही प्रतिभेची गरज असते. ती नसल्यास साहित्यात प्रचलित शब्दच वापरायला हवेत. दुसरे म्हणजे, साहित्य प्रकाशित होण्यापूर्वी त्यावर केले जाणारे संस्कार म्हणजे प्रकाशनातील अडथळा वा सेन्सॉरशिप नव्हे. या आवश्यक प्रक्रिया आहेत. अनेकदा लेखक अत्यंत पसरट, विस्कळीत लिहीत असतो. त्याचे संपादन होऊनच ते वाचकांपर्यंत पोहोचायला हवे. लेखनात प्रमाण, शुद्ध भाषाच वापरायला हवी. एखाद्या शब्दाला मराठीत पर्यायी शब्द उपलब्ध असल्यास तोच वापरावा. अशा वेळी उगाच इंग्रजीचा अट्टहास नको. प्रत्येक भाषेचे एक सौंदर्य, सौष्ठव असते. ते जपायलाच हवे.

> लेखकांसाठी खास पदवी अभ्यासक्रमच सुरू करण्याचा तुमचा मानस आहे? 
- हो, नवीन, सर्जनशील लेखकांसाठी असा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार आहे. पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी आपण लेखकांच्या कार्यशाळा घेऊ शकतो; मात्र छोट्या शहरांतील, खेड्यांतील नवलेखकांना तेथे येणे शक्य होत नाही. अशांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केल्यास त्याचा त्यांना फायदा होऊ शकेल. त्यात लेखनाचे तंत्र, शैली, एखाद्या फॉर्मच्या मर्यादा, कथेची बांधणी, कॅरेक्टर्सची उभारणी, क्‍लायमॅक्स, भाषेचा वापर आदी गोष्टी शिकविण्याचा विचार सुरू आहे. एखाद्याच्या अंगात अभिनय उपजत असला, तरी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतल्यास त्यात अधिक शास्त्रशुद्धता येते. लेखनाबाबतही असेच काहीसे करण्याचा विचार आहे. अर्थात, हे सारे साहित्य महामंडळाच्या बॅनरखाली करावयाचे आहे. वैयक्‍तिक कार्यक्रमापेक्षा संस्थात्मक पातळीवर उपक्रम घेतल्यास त्यात शिस्त असते. यासंदर्भात मी पुढील एक-दीड महिन्यातच महामंडळाशी चर्चा करणार आहे. 

> विश्‍वकोशाचे अ‍ॅप नुकतेच सुरू झाले. शब्दकोशाचीही अनेक अ‍ॅप्स आहेत. हे सारे भाषेसाठी कितपत उपयुक्‍त ठरू शकेल?
- अशा अ‍ॅप्सचा फायदा होतो. मी स्वत: काही मराठी अ‍ॅप्स डाउनलोड करून घेतली असून, त्यांची अनेकदा मदत होत असते. काही अ‍ॅप्सवरील मजकूरही मी नियमित वाचत असतो. त्यातून काही चांगले संदर्भ मिळतात. मात्र, ही अ‍ॅप्स लोकांपर्यंत पोहोचायला हवीत. वर्तमानपत्रांनी त्यांची माहिती सातत्याने प्रसिद्ध करायला हवी. सोशल मीडियावरही जागृती व्हायला हवी. फेसबुकवर सुरुवातीला दोन मित्र जोडल्यानंतर पुढे आपोआप मित्र सुचविले जातात आणि ही मित्रसाखळी वाढतच जाते. तसे या अ‍ॅप्सबाबत व्हायला हवे.

> निर्दोष, शुद्ध व आशयघन डिजिटल साहित्य निर्माण व्हावे व ते लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी सरकारने काय करायला हवे, असे वाटते?
- सरकारने दोन गोष्टी करायला हव्या. एक तर मराठी विकीपीडियावर लक्ष केंद्रित करायला हवे. त्यासाठी अनेक संस्था पुढे येण्यास तयार आहेत. इंग्रजी विकीपीडियावर मराठीपेक्षा कितीतरी पटींनी अधिक संदर्भ उपलब्ध असतात. मराठीतील संदर्भांची संख्या वाढविण्यासाठी सर्वच महाविद्यालये, विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला हवेत. आपल्याकडे असलेली माहिती त्यावर अपलोड करायला हवी. सरकारने या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली असली, तरी त्यात लोकसहभागही गरजेचा आहे. दुसरे म्हणजे, कॉपीराइट मुदत संपलेली पुस्तके लोकांना स्वस्तात उपलब्ध करून द्यायला हवीत. असा प्रयोग एका प्रकाशन संस्थेने केला असून, तो यशस्वी ठरला आहे. 

> तुम्ही साहित्य संमेलनातील भाषणात मराठी पुस्तकांच्या हिंदी-इंग्रजीतील अनुवादाचा मुद्दा मांडला होता. त्यातून मराठीला किती फायदा होऊ शकेल? 
- यासंदर्भात मी सरकारला आंतरभारती अनुवाद केंद्र स्थापन करण्याची विनंती केली आहे. त्याचा कच्चा आराखडाही शासनाला पाठविला आहे. याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मदतीने येत्या मे महिन्यात अनुवाद कार्यशाळा घेण्याचा मानस आहे. मूळ मराठी असलेले जे प्राध्यापक हिंदी व इंग्रजी शिकवितात, त्यांना पत्र पाठवून आवाहन केले जाणार आहे. त्यांच्याकडून मराठीतील उत्तम पुस्तकांचा हिंदी-इंग्रजीत अनुवाद करवून घेण्याचा विचार सुरू आहे. मात्र, त्यासाठी निधीची गरज लागणार आहे. या अनुवादकांना किमान मानधन तरी द्यावे लागणार आहे. अशी 25 ते 50 पुस्तके अनुवादित झाली, तरी मोठे काम होणार आहे. अशा अनेक कल्पना आहेत. त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल.  

> सध्या वास्तव घटनांवर आधारित पुस्तकांनाच अधिक मागणी आहे. कादंबरी हा साहित्यप्रकार मागे पडत चालल्याचे चित्र आहे. त्याबद्दल काय वाटते?
- कादंबरी, फिक्शन, ललित साहित्यापेक्षा माहितीपर पुस्तकांना सध्या अधिक मागणी असली, तरी या साहित्याला आपण नाकारू शकत नाही. त्याचे स्वागतच करायला हवे. मात्र, कथा, कादंबरी, नाटके हे साहित्य वाचकाला अधिक मानवीय बनवते. त्यातून विचारदर्शन घडते. ते मानवी मनाला अधिक उन्नत करते. या प्रकारच्या साहित्याला सध्या मागणी कमी असली, तरी मानवाला मूलत: कथेची असलेली ओढ पाहता, या साहित्याची निर्मिती  वेग घेईल व ते लोकप्रिय होईल, असे वाटते.

> शेवटचा प्रश्‍न, मायमराठीच्या अस्तित्वाचे काय?
- सध्या मराठीची अवस्था बिकट आहे. लोकांचा इंग्रजीकडे ओढा वाढत चालला आहे. 90 टक्के इंग्रजी शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही. इंग्रजी माध्यमात शिकणारी मराठी मुले मराठी वर्तमानपत्र वाचत नाहीत. यावर उपाय म्हणजे सर्व शाळांंमध्ये मराठी हा विषय अनिवार्य करायला हवा. या भाषेचा देशात सर्वदूर प्रसार करायला हवा. मराठी ही तरुणांची भाषा व्हायला हवी, त्यांना मराठीतून बोलावेसे वाटायला हवे. तरच मराठीचे अस्तित्व टिकू शकेल. आपण सर्वांनीच यात योगदान देण्याची गरज आहे.