Sat, Apr 20, 2019 18:09होमपेज › Nashik › नगरसचिव विभागाला आयुक्‍तांची तंबी

नगरसचिव विभागाला आयुक्‍तांची तंबी

Published On: Jan 17 2018 2:02AM | Last Updated: Jan 16 2018 10:46PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनधी 

महासभेत ऐनवेळी येणार्‍या जादा विषयाबाबत मनपा आयुक्‍तांनी देखील आक्षेप घेत यापुढे जादा विषयांचे प्रस्ताव विषयपत्रिकेसोबत सादर करण्याचे आदेश नगरसचिव विभागाला दिले आहेत. यामुळे किमान यापुढे तरी अशा जादा विषयांना चाप बसण्याची शक्यता आहे. 

बहुतांश वेळा महासभांमध्ये खातेप्रमुखांकडून तसेच काही पदाधिकार्‍यांकडून जादा विषय ऐनवेळी सादर केले जातात. खरे तर महासभेत येणार्‍या प्रत्येक प्रस्तावाविषयी मनपा आयुक्‍तांना माहिती असणे आवश्यक असते. मात्र, अनेकदा खातेप्रमुखांकडून आयुक्‍तांनाही अंधारात ठेवण्याचा प्रकार केला जातो. महासभा सुरू झाल्यानंतर त्या-त्या खात्याकडून प्रस्ताव सदस्यांना सादर केला जातो. यामुळे त्यास सदस्यांकडूनही आक्षेप घेतला जातो. गेल्या अनेक महासभांमध्ये अशा प्रकारचे अनेक जादा विषय सादर झाल्याने त्यावरून वाद निर्माण झाले. यामुळे या प्रकाराची गंभीर दखल आयुक्‍त अभिषेक कृष्णा यांनी घेवून त्याबाबत नगरसचिवांना कार्यालयीन आदेश जारी केले आहेत. दर महिन्याला होणार्‍या महासभेत नियमित विषयांचे प्रस्ताव विषयपत्रिकेसह आयुक्‍तांकडे महासभेपूर्वी सादर केले जातात. नियमित विषयांसोबतच जादा विषयांवर सभागृहात चर्चा होत असते. अशा जादा विषयांबाबतचे प्रस्ताव आयुक्‍तांकडे सादर केले जात नसल्याची बाब निदर्शनास आल्याने त्याबाबत त्यांनी नगरसचिव विभागाला पत्र देत यापुढे जादा विषयांचे प्रस्ताव विषयपत्रिकेसह आपल्या माहितीकरता महासभेपूर्वी सादर करण्याची दक्षता घ्यावी, असा इशारा दिला आहे. सभागृहात सदस्य जादा विषयांचे प्रस्ताव वाचून दाखविण्याची मागणी करत असतात. परंतु, या जादा विषयांचे प्रस्ताव सभागृहात येत नाही. यामुळे सदस्यांनाही या प्रस्तावाबाबत माहिती नसते आणि आयुक्‍तांनाही माहिती मिळत नसल्यानेच आयुक्‍तांनी या बाबीची गंभीर दखल घेत नगरसचिव विभागास पत्र सादर केले आहे.