Wed, Apr 24, 2019 19:32होमपेज › Nashik › केंद्राचे पथक करणार मनपा, नगर परिषदांची पाहणी

केंद्राचे पथक करणार मनपा, नगर परिषदांची पाहणी

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 28 2017 11:31PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत राबविण्यात आलेल्या हागणदारीमुक्त अभियानाच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक येत्या 4 जानेवारीपासून राज्याच्या दौर्‍यावर येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ त्र्यंबकेश्‍वर येथून होणार आहे. सर्वेेक्षणादरम्यान, हे पथक गुण देणार आहेत. या मोहिमेत राज्यातील जास्तीत जास्त शहरांचा समावेश व्हावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारची सन 2018 साठीच्या स्वच्छ भारत अभियानाबाबत बैठक घेतली. या बैठकीदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील जिल्हाधिकारी तसेच, नगर परिषदांच्या मुख्याधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी नगरविकास विभागाच्या मुख्याधिकारी मनीषा म्हैसकर उपस्थित होत्या.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात राज्यातील अधिकाधिक शहरांचा समावेश व्हावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. त्यासाठी लोकप्रतिनिधींचाही यात समावेश करून घेतानाच त्यांच्या बैठका घेऊन स्वच्छतेचे महत्त्व त्यांना पटवून द्यावे. तसेच, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रभातफेर्‍या, नागरिकांच्या बैठका घेऊन त्यांच्यामध्ये शहर स्वच्छतेबाबत जनजागृती करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील नाशिक व मालेगाव मनपासह त्र्यंबकेश्‍वर, सिन्नर, इगतपुरी, भगूर, सटाणा, मनमाड, नांदगाव, येवला आणि चांदवड नगर परिषदा हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. या सर्व ठिकाणी केंद्र सरकारचे पथक जानेवारीत पाहणी करून गुण देणार आहेत. दरम्यान, राज्यातील इतर जिल्ह्यांमधील मनपा तसेच नगर परिषदांना हे पथक भेट देतील. 4 जानेवारी ते 28 फेब्रुवारी याकाळात या भेटी दिल्या जाणार आहे. त्यानंतर हे पथक आपला अहवाल केंद्राला सादर करतील. या अहवालावरून सरकार स्वच्छतेबाबत मनपा व जिल्ह्यांची क्रमांकानुसार घोषणा करेल. त्यासाठी मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.