Fri, Jul 19, 2019 05:04होमपेज › Nashik › वाढीव शुल्क घेणार्‍या महाविद्यालयांची चौकशी

वाढीव शुल्क घेणार्‍या महाविद्यालयांची चौकशी

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 11:54PMनाशिक : प्रतिनिधी

शासन आदेश धाब्यावर बसवून महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रियेत विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर वाढीव शुल्क वसूली करणार्‍या शहरातील 17 कनिष्ठ महाविद्यालयांच्या चौकशीचे आदेश शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी काढले आहेत. यासाठी द्विस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली असून, यात छात्रभारती संघटनेच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात आला आहे. तातडीने चौकशी पूर्ण करण्याचेही आदेशात म्हटले आहे. 

प्रवेशप्रक्रियेदरम्यान शहरातील महाविद्यालयांकडून होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पिळवणूकप्रकरणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने दि.27 जून रोजी नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक जाधव यांना दिलेल्या निवेदनावरून ही कारवाई करण्यात आली आहे. या निवेदनानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने संबंधित सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवून प्राचार्यांकडून आठ दिवसांच्या आत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल मागविला होता. मात्र आठ दिवसांची मुदत संपल्यानंतरही संबंधित महाविद्यालयांनी हा अभिप्राय न पाठविल्यानेजाधव यांनी शहरातील 17 महाविद्यालयांच्या चौकशीचा निर्णय घेत उपसंचालक कार्यालयातील उपशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांची द्विस्तरीय चौकशी समिती नियुक्‍त केली आहे.

चौकशी समितीत छात्रभारतीचे प्रतिनिधी

चौकशी समितीत छात्रभारतीच्या समाधान बागूल, राकेश पवार, सदाशिव नलगे, निखिल गुंजाळ, दीपक देवरे, निवृत्ती खेताडे या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात आला आहे. समितीने चौकशीच्या वेळी या प्रतिनिधींनाही सोबत घेऊन जावे. छात्रभारतीच्या निवेदनातील सहा मुद्यांवर चौकशी करावी. तसेच या चौकशीस विलंब होणार नाही, याचीही दक्षता घेण्याचे आदेशात म्हटले आहे.

.. या सहा मुद्यांवर होणार चौकशी

6 मार्च 1986च्या मुलींना बारावीपर्यंत मोफत शिक्षण हक्‍क कायद्याच्या अंमलबजावणीबाबत... 

अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतील अडचणींबाबत विभागीय कार्यालयामार्फत माहितीची पुरेपूर अट विद्यार्थ्यांपर्यंत न पोहोचल्याने निर्माण होत असलेला संभ्रण... 

बारावीच्या विद्यार्थ्यांकडून पॅटर्न फिच्या नावाखाली वसूल केली गेलेल्या अतिरिक्‍त क्‍लासेसच्या फीबाबत...

या महाविद्यालयांमध्ये कॅम्पिटेशन अ‍ॅक्ट, अतिरिक्‍त सुविधा, मॅगझिनच्या नावाखाली निधी न घेण्याबाबत कायदा असूनही विद्यार्थ्यांच्या होणार्‍या लुटीबाबत... 

 अनुदानित महाविद्यालयांची एकूण फीधारणा ही शिक्षणाधिकार्‍यांनी ठरवून दिल्याप्रमाणेच घेणेबाबत... 

विनाअनुदानित सर्व महाविद्यालयांची प्रवेश फी एकच असावी. संबंधित महाविद्यालयांना फी धारणा स्वरूप कळविण्याबाबत...

...या महाविद्यालयांची होणार चौकशी : 

1) केटीएचएम कनिष्ठ महाविद्यालय, गंगापूर रोड, 2) सीएमसीएस कनिष्ठ महाविद्यालय, गंगापूररोड, 3) एलव्हीएच कनिष्ठ महाविद्यालय, पंचवटी, 4) व्ही. एन. नाईक महाविद्यालय, कॅनडा कॉर्नर, 5) बीवायके कनिष्ठ महाविद्यालय, कॉलेज रोड, 6) आरवायके कनिष्ठ महाविद्यालय, कॉलेज रोड, 7) एचपीटी कनिष्ठ महाविद्यालय, कॉलेज रोड, 8) एसएमआरके कनिष्ठ महाविद्यालय, कॉलेज रोड, 9) केएसकेडब्ल्यू कनिष्ठ महाविद्यालय, सिडको, 10) जी.डी. सावंत कनिष्ठ महाविद्यालय, पाथर्डीगाव, 11) पीव्हीजी कनिष्ठ महाविद्यालय, मेरी, पंचवटी, 12) बिटको कनिष्ठ महाविद्यालय, नाशिकरोड, 13) डी.डी. बिटको कनिष्ठ महाविद्यालय, सीबीएस, 14) भोसला मिलीटरी कनिष्ठ महाविद्यालय, गंगापूररोड, 15) के. के. वाघ कनिष्ठ महाविद्यालय, नाशिक, 16) जनता ज्यूनिअर कॉलेज, सातपूर, 17) ग्लोबल पब्लिक ज्यूनिअर कॉलेज, म्हसरुळ.