Tue, Apr 23, 2019 10:08होमपेज › Nashik › नाशिकमधील सराफांची ईडीकडून चौकशी सुरुच

नाशिकमधील सराफांची ईडीकडून चौकशी सुरुच

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 23 2018 12:03AMनाशिक : प्रतिनिधी

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा गंडा घालणार्‍या संशयित नीरव मोदी याच्या ‘गितांजली’ या ब्रॅण्डची फ्रँचायजी घेतलेल्या शहरातील सुराणा ज्वेलर्ससह इतर सराफ व्यावसायिकांची गुरुवारी (दि.22) सक्‍तवसुली संचलनालयातर्फे (ईडी) चौकशी सुरु असल्याची चर्चा होती. काही सराफ पेढी बंद असल्याने तर काही पेढ्यांनी एक प्रवेशद्वार उघडे ठेवल्याने  चौकशी सुरु असल्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. 

पीएनबी घोटाळा उघडकीस आल्यानंतर आयकर विभाग आणि सक्‍तवसुली संचलनालयामार्फत देशभरातील अनेक सराफांची चौकशी केली जात आहे. नाशिकमधील सुराणा ज्वेलर्ससह जुना गंगापूर नाका आणि कॉलेज रोड येथील सराफ पेढीकडे गीतांजलीची फ्रॅचायजी होती. या माध्यमातून  जिल्ह्यातील अनेकांनी खरेदी केली होती. त्यामुळे त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी इडीचे  पथके बुधवारपासून शहरात ठाण मांडून आहेत. बुधवारी (दि.21) दुपारपासूनच सुराणा ज्वेलर्ससह जुना गंगापूर नाका आणि कॉलेजरोड परिसरातील एका सराफी पेढीवर  चौकशी सुरु केली होती. गुरुवारी (दि.22) देखील या ठिकाणी चौकशी सुरु असल्याची चर्चा होती.

मात्र याबाबत कोणीही अधिकृत माहिती दिली नाही. बुधवारी अचानक टाकलेल्या छाप्यामुळे शहरातील अन्य सराफी व्यावसायिकांमध्येही धडकी भरली. तिन्ही सराफ दुकानांबाहेर खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. कॉलेजरोड आणि जुना गंगापूर नाका येथील तपासणी बुधवारी रात्रीच पूर्ण झाल्याचे समजते. तर गुरुवारी सुराणा ज्वेलर्स येथे दुपारपर्यंत चौकशी सुरू असल्याची चर्चा होती. या छापासत्रामुळे शहरात उलटसुलट चर्चेस उत आला होता. मात्र चौकशीतून कोणती माहिती समोर आली याचे कोडे उलगडू शकले नाही.