Tue, May 21, 2019 22:10होमपेज › Nashik › जिल्हा बँकेच्या भरतीची ‘लाचलुचपत’मार्फत चौकशी

जिल्हा बँकेच्या भरतीची ‘लाचलुचपत’मार्फत चौकशी

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:49PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या नोकरभरतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यासंदर्भात प्राप्त तक्रारीची गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी तत्काळ दखल घेतली. पुढील कार्यवाहीचे आदेश गृह विभागाच्या अतिरिक्‍त मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. आधीच संकटात सापडलेल्या बरखास्त संचालक मंडळाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँकेत लिपिक आणि शिपायांची 414 पदे भरताना कोणत्याही प्रकारची परवानगी न घेण्यात आल्याने भरती संशयाच्या भोवर्‍यात सापडली. तसेच मागासवर्गीयांचा अनुशेष डावलण्यात आला. सहकार कायदा कलम 88 नुसार ज्या मुद्यांची चौकशी झाली, त्यात भरतीचाही मुद्दा समाविष्ट होता. त्यामुळेच आरोपपत्र दाखल करताना प्रत्येक संचालकाकडून 42 लाख रुपये वसुली निश्‍चित करण्यात आली आहे. वादग्रस्त भरती एवढ्यावरच थांबली नसून जनता दलाचे सचिव डॉ. गिरीश मोहिते यांनी केसरकर यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार केली होती. 15 लाख रुपये घेऊन भरती केलेल्या कर्मचार्‍यांना बेकायदेशीरपणे कायम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे.  

भरतीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी व्हावी म्हणून आदेश द्यावेत, अशी विनंती मोहिते यांनी केली आहे. या ई-मेलची तत्काळ दखल घेत केसरकर यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश गृह विभागाच्या अतिरिक्‍त मुख्य सचिवांना मंगळवारी दिले आहेत. आधीच संचालकपद गेले. त्यात वसुलीचीही टांगती तलवार कायम आहे. कारण रक्कम न भरल्यास थेट मालमत्तांवरच टाच येणार आहे. आता भरतीचा मुद्दा थेट गृह राज्यमंत्र्यांपर्यंतच पोहोचल्याने आणि त्यातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फतच चौकशी होणार असल्याने संचालकांची डोकेदुखी वाढली आहे.