Sun, Jul 21, 2019 10:11होमपेज › Nashik › २०२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसर्‍या स्थानी : प्रकाश पाठक 

२०२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसर्‍या स्थानी : प्रकाश पाठक 

Published On: Jun 17 2018 1:36AM | Last Updated: Jun 16 2018 11:34PMनाशिक : प्रतिनिधी

भारताला दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे मागील काही वर्षांत भारताचा विकास झपाट्याने होत आहे. 2025 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार करता भारताची अर्थव्यवस्था तिसर्‍या स्थानी राहील, असा विश्‍वास सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश पाठक यांनी केला.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरतर्फे चेंबर संस्थापक अध्यक्ष शेठवालचंद यांच्या स्मरणार्थ वालचंद स्मृती व्याख्यानमालेतील 45 वे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. ‘जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अमित कामत, अनिलकुमार लोढा, गौतम ठाकूर, शुभांगी तिरोडकर आदी उपस्थित होते.

पाठक पुढे म्हणाले, देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात 49 टक्के हिस्सा हा शेतीचा आहे. मात्र, या क्षेत्राकडे दुर्लक्ष होत आहे. शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितल्यास मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल. भारतात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक होत असून, त्यामुळे देशात पायाभूत सुविधा निर्माण होईल. परिणामी देशाच्या अर्थव्यवस्थेला तेजी मिळेल, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी संतोष मंडलेचा यांनी प्रास्ताविक केले. माजी अध्यक्ष अरविंद दोशी यांनी आभार  मानले. यावेळी माजी अध्यक्ष अरविंद जोशी,  अमिलाल आनंदपरा, हेमंत राठी, मीनल मोहाडीकर,  आशिष पेडणेकर यांच्या सहराज्यातील नागपूर, अकोला, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, जळगाव, धुळे, मालेगाव, कळवण, नाशिक, ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथील कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.  

चेंबरच्या पदाधिकार्‍यांनी सूत्रे स्वीकारली 

वालचंद स्मृती व्याख्यानमालेपूर्वी चेंबरची 90 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेंबरच्या डहाणूकर सभागृहात चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सन 2018-20 या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल चेंबरचे प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे यांनी जाहीर केला. निवृत्त उपाध्यक्ष अनिल वाघाडकर, करुणाकर शेट्टी व समीर दुधगावकर यांना माजी अध्यक्षांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच निवडून आलेले उपाध्यक्ष गौतम ठाकूर, शुभांगी तिरोडकर व उमेश दशरथी यांचे माजी अध्यक्षांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

चेंबरच्या अध्यक्षपदी संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्षपदी अमित कामत व अनिल लोढा यांची या वर्षीही फेरनिवड झाली आहे. त्यांना पुढील कालावधीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र चेंबर ट्रस्टचे विश्‍वस्त म्हणून खुशाल पोद्दार, आशिष पेडणेकर, विलास शिरोरे, कैलास खंडेलवाल आणि विश्‍वजित डहाणूकर, संजय घोडावत यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कार्यकारिणी सदस्य  शुभांगी तिरोडकर, मनप्रीत नेगी, भावेश माणेक, अंजू सिंगल, सुनीता फाल्गुने, सलीम बटाडा, सी. एस. सिंग, कृष्ण परब  तर स्क्रुटीनी कमिटी सदस्य नीलेश कापडिया, गणपत बेलणेकर यांनाही गौरविण्यात आले.