Tue, Jul 16, 2019 01:47होमपेज › Nashik › मनपाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांना घेराव

मनपाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांना घेराव

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 22 2018 11:54PMसिडको : प्रतिनिधी

परिसरातील रायगड चौकात मंगळवारी (दि.22) दुपारी वाढीव बांधकामांना मार्किंग करण्यासाठी आलेल्या मनपाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना नागरिकांनी घेराव घालून तीव्र विरोध केला. नागरिकांचा विरोध डावलून मनपातर्फे घरांच्या वाढीव बांधकामांना मार्किंग करण्याचे काम सुरूच ठेवत सुमारे तीनशे घरांच्या वाढीव बांधकामांना लाल रंगाने मार्किंग करण्यात आले. अतिक्रमण काढल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. दरम्यान, नागरिकांनी सिडकोच्या पहिल्या योजनेपासून मार्किंग सुरू करावी, अशी  मागणी विभागीय अधिकार्‍यांकडे केली.

अतिक्रमणाबाबत शहराप्रमाणेच सिडकोलाही सारखेच नियम असल्याचे सांगून सिडकोतील सुमारे 25 हजार घरांचे वाढीव बांधकाम मनपा आयुक्‍त मुंढे यांनी अतिक्रमित जाहीर केले. मनपाची मंगळवारी  मोहीम सुरू झाली. मनपा सिडको विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी दुपारी तानाजी चौकात आले. या चौकात त्यांनी सुमारे दोनशे वाढीव बांधकामांना लाल रंगाने  मार्किंग केले. यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास मनपा अधिकारी व कर्मचारी रायगड चौकात पोहोचले. या चौकात कर्मचार्‍यांनी मार्किंग करण्यास सुरुवात केली. याची माहिती परिसरात समजताच नागरिक जमा झाले. यानंतर मनपा विभागीय अधिकारी डॉ. कुमावत यांना नागरिकांनी घेराव घातला. या मार्किंगचे काम बंद करावे, अशी मागणी करत नागरिकांनी मनपाविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे  वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पंधरा ते वीस मिनिटे मार्किंगचे काम बंद ठेवण्यात आले.  नागरिकांच्या विरोधाला न जुमानता पुन्हा मार्किंगला सुरुवात झाली.