Tue, Jul 23, 2019 11:13होमपेज › Nashik › निधी, सीएसआर फंडाची प्रतीक्षाच 

निधी, सीएसआर फंडाची प्रतीक्षाच 

Published On: Mar 17 2018 1:14AM | Last Updated: Mar 17 2018 12:34AMनाशिक : प्रतिनिधी

कुपोषणाचा आकडा वाढत असताना सरकारी पातळीवरून निधी उपलब्ध करून देण्यात मात्र हात आखडता घेतला असल्याने ग्राम बालविकास केंद्र लोकवर्गणीतून सुरू करण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागावर आली आहे. कुपोषणाच्या मुद्यावर सरकार गंभीर नसल्याचेच यावरून समोर आले.

जिल्ह्यात कुपोषणाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. नुसत्याच झालेल्या समितीच्या मासिक सभेत आढाव्यादरम्यान कुपोषित बालकांची संख्या 2600 असल्याची माहिती देण्यात आली. यात तीव्र गंभीर कुपोषित बालके 629 आहेत. दुसरीकडे मात्र कुपोषण निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याकामी उदासीनता दाखविली जात असल्याचे दिसून येत आहे. निधीअभावी दरम्यानच्या काळात ग्राम बालविकास केंद्रे बंदच होती.

सरकारने ही केंद्रे सुरू करण्यासाठी आदेश दिले खरे; पण निधी देण्यात हात आखडता घेतला आहे. या केंद्रांमध्ये बालकांना दाखल करून घेऊन त्यांचे उदरभरण केले जाते. तसेच आरोग्य तपासणीही केली जाते. पण, निधीच नसल्याने ही केंद्रे चालविणार कशी, असा प्रश्‍न अधिकार्‍यांसमोर उभा होता. सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून जिल्हाधिकारी उद्योजकांना पत्र पाठविणार होते. त्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश महिला व बालकल्याण विभागाला देण्यात आले होते. शिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हेही जिल्हाधिकार्‍यांशी यासंदर्भात बोलणार होते. निधी मिळाला नसल्याने ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यासाठी लोकवर्गणीचा आधार घ्यावा लागला. लोकवर्गणीतून तीन लाख 35 हजार रुपये जमा झाले असून, 410 ग्राम बालविकास केंद्रे सद्यस्थितीत सुरू आहेत.

Tags : nashik, nashik news, malnutrition, government funding,