Tue, Jul 16, 2019 21:48होमपेज › Nashik › पिंपळगाव बाजार समितीत कांदा आवकेत वाढ

पिंपळगाव बाजार समितीत कांदा आवकेत वाढ

Published On: Feb 13 2018 2:02AM | Last Updated: Feb 12 2018 11:23PMपिंपळगाव बसवंत : वार्ताहर

आठवड्याच्या सुरुवातीलाच पिंपळगाव बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक वाढल्याने बाजार आवारात सकाळपासूनच मालवाहतूक वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इतर दिवसांच्या तुलनेत आवक वाढलेली असतानाही बाजारभाव मात्र स्थिर राहिले. त्यात विशेष कुठलीही घसरण झाली नाही.

मागील आठवड्यात बाजार समितीत कांद्याला सरासरी 1801 रुपये बाजारभाव मिळाला होता. शनिवार, रविवार बाजार समित्या बंद होत्या. परिणामी, पिंपळगाव बाजार समितीत कांदा आवक वाढली. जोपूळ रोडवरील 100 एकर जागेत सध्या कांदा लिलाव केले जात आहे. 

अचानक वाढलेली आवक लक्षात घेता जिथे टोमॅटो लिलाव व भाजीपाला लिलाव होतो तो भाग आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या जागेत ट्रॅक्टर, जीप लावण्यात आले होते. सकाळच्या लिलावासाठी 1256 इतकी कांदा वाहतूक वाहने आली होती. त्यापैकी 1106 वाहनांमधून आणलेल्या कांद्याचा लिलाव करण्यात आला. सरासरी बाजारभाव 1851 प्रती क्‍विंटल होता. तर दुपारच्या लिलावात उर्वरित 150 वाहनांतील कांद्याचा लिलाव करण्यात आला. सोमवारी दिवसभरात सुमारे 24 हजार क्‍विंटल आवक झाली.