Mon, Jan 21, 2019 16:11होमपेज › Nashik › नाशिक शहरात 114 नागरिकांना डेंग्यूचा डंख

नाशिक शहरात 114 नागरिकांना डेंग्यूचा डंख

Published On: Aug 30 2018 1:22AM | Last Updated: Aug 30 2018 12:59AMनाशिक : प्रतिनिधी

शहरातील डेंग्यूच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत असून, एकट्या ऑगस्ट महिन्यात तब्बल 114 नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाकडील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. चालू वर्षी जानेवारीपासून ते ऑगस्टपर्यंत डेंग्यूचे तब्बल 352 रुग्ण आढळले आहेत. गतवर्षी जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान 210 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. डेंग्यू रुग्णांच्या संख्येत यंदा वाढ झाली असून, त्या पार्श्‍वभूमीवर डेंग्यूग्रस्त भागात मनपाने विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. 

मोहिमेच्या माध्यमातून शहरातील निवडक दहा प्रभागांत डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी विशेष लक्ष केंद्र केले जाणार आहे. मलेरिया आणि  पेस्ट कंट्रोल विभागातील कर्मचारी सकाळच्या सत्रातील काम आटोपून संबंधित प्रभागांतील घरोघरी सलग तीन दिवस भेट देणार आहेत. घराचे छत, घर परिसर, भंगार, टायर्स, फ्रीज, कूलर्स, झाडाच्या कुंड्या, नवीन बांधकाम, टायर्स दुकान आदींची तपासणी करून डेंग्यू डासांच्या अळ्या आढळल्यास पाणी साठे रिकामे करणे किंवा बेटिंग कीटकनाशक औषध टाकण्याचे काम करणार आहेत. डासांच्या अळ्या आढळणार्‍या घरमालकास नोटिसा देण्यात येणार आहे. मोहिमेत माहितीपत्रके वाटप, स्टिकर्स आणि ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती केली जाणार आहे.

विशेष मोहीम सातपूर विभागातील प्रभाग क्र. 9 व 10, पंचवटी विभागातील प्रभाग क्र.1 व 2, पूर्व विभागातील प्रभाग क्र. 23 व 30, नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र. 20 व 21, तसेच, सिडको विभागातील प्रभाग क्र. 25 व 31 मध्ये राबविण्यात येणार आहे. विशेष  मोहिमेत मनपाचे 210 कर्मचारी आहे.