Wed, Jul 24, 2019 12:44होमपेज › Nashik › नाशिकमध्ये रंगणार तिरंगी लढत सहाणे, दराडे, कोकणी रिंगणात

नाशिकमध्ये रंगणार तिरंगी लढत सहाणे, दराडे, कोकणी रिंगणात

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 11:48PMनाशिक : प्रतिनिधी 

विधान परिषद निवडणुकीत सोमवारी (दि.7) माघारीच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्‍वर गायकवाड आणि अपक्ष अशोक आहेर यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे अ‍ॅड. शिवाजी सहाणे, सेनेचे नरेंद्र दराडे आणि अपक्ष परवेज कोकणी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. 

माघारीच्या दिवशी अखेरच्या पाऊण तासात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. दुपारी सव्वादोन वाजता राष्ट्रवादीचे पदाधिकारी अर्जुन टिळे यांच्या वाहनातून गायकवाड यांचे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आगमन झाले. वाहनातून उतरताच गायकवाड यांनी थेट जिल्हाधिकार्‍यांचे दालन गाठत माघारीसाठी अर्ज दाखल केला. गायकवाड यांनी अपक्ष अर्ज भरलेला होता. माघारीनंतर त्यांनी आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. सहाणे यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, गायकवाड यांच्याच पाठीमागे देवळा विकास आघाडीचे नेते व अपक्ष उमेदवार अशोक आहेर यांनीही निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज सादर करत निवडणुकीतून माघार घेतली. विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यापासूनच नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत.

अर्ज भरायच्या दिवशी अखेरपर्यंत दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीबाबत एकमत झाले नव्हते. परिणामी, काँग्रेसने ज्ञानेश्‍वर गायकवाड यांना अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काही मिनिटे शिल्लक असताना उमेदवारी दाखल करायला सांगितले होते. गायकवाड यांच्या अर्जाने राष्ट्रवादीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली होती. दरम्यान, अर्ज छाननीच्या दिवशी सहाणे यांनी थेट सेनेचे दराडे यांच्या उमेदवारी अर्जावरच हरकत नोंदविली होती. सकाळी 11 वाजता नोंदविलेल्या हरकतीवर जिल्हाधिकार्‍यांनी 12 तासांनी निकाल देत दराडेंचा अर्ज वैध ठरविला. दोघा उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता सहाणे, दराडे व कोकणी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत खरी रंगत येणार आहे. प्रत्येक मत हे ‘लाख’मोलाचे ठरणार आहे. परिणामी, ‘दाम करी काम’ या उक्तीनुसार उमेदवारांचे विजयाचे गणित अवलंबून असेल. त्यामुळे ऐन मे महिन्यात जिल्ह्यातील राजकारण तापणार आहे.

अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी झाली नव्हती. त्यामुळे काँग्रेस पक्षाची गरज म्हणून अर्ज दाखल केला होता. आता आघाडी झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार आज माघार घेतली. काँग्रेसचा पाठिंबा राष्ट्रवादीचे उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांना आहे. असे ज्ञानेश्‍वर गायकवाड यांनी सांगितले. निवडणुकीच्या दृष्टीने अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांनी यंदा उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या आग्रहाखातर मी अर्ज मागे घेतला आहे. देवळा विकास आघाडीचा अध्यक्ष या नात्याने आघाडीचा पाठिंबा कोकणी यांनाच असेल. असे अशोक आहेर यांनी सांगितले.