Mon, Mar 25, 2019 09:51होमपेज › Nashik › नाशिकमध्ये बंद कडकडीत

नाशिकमध्ये बंद कडकडीत

Published On: Jul 26 2018 1:38AM | Last Updated: Jul 26 2018 1:38AMनाशिक : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी शहराच्या काही भागांत बुधवारी (दि. 25) कडकडीत बंद पाळण्यात आला, तर काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले. नाशिकरोड परिसरात एटीएम, दुकानांची तोडफोड करण्यात आली. ठिकठिकाणी रास्ता रोको, टायर्सची जाळपोळ, घोषणाबाजीने शहर दणाणून गेले. गंगापूर धरणात खासदार चंद्रकांत खैरे, आमदार राम कदम यांच्या प्रतिमांना जलसमाधी देत सरकारचा निषेध केला. पोलिसांकडून दिवसभर आंदोलकांची धरपकड सुरू होती. 

मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद लाभला. शहरातील काही बाजारपेठा बंद राहिल्या. काही शाळा बंद ठेवण्यात आल्या, तर सुरू असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती राहिली. जिल्ह्यात बंदकाळात ठिकठिकाणी रास्ता रोको, टायर्सची जाळपोळ करण्यात आली. एटीएम केंद्रासह सहा दुकानांची तोडफोड, घोषणाबाजी, दुचाकींवरून घोषणाबाजी करण्यात आली होती. नाशिकरोड, उपनगर परिसरात बंदला हिंसक वळण लागले. काही समाजकंटकांनी दुकाने व वाहनांची तोडफोड केली. काही ठिकाणी जाळपोळीचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतल्याने अनर्थ टळला. शहर पोलिसांनी 13, तर ग्रामीण पोलिसांनी 9 आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलकांची धरपकड दिवसभर सुरू होती. त्यांना सायंकाळनंतर सोडण्यात आले. खासदार चंद्रकांत खैरे, आमदार राम कदम यांनी मराठा समाजाबद्दल कथित बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिमांना गंगापूर धरणात प्रतीकात्मक जलसमाधी देण्यात आली.  ग्रामीण पोलिसांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या करण गायकर, तुषार जगताप, उमेश शिंदे, विजय खर्जुल, मधुकर कासार, मदन गाडे, विकास काळे, वैभव दळवी यांना ताब्यात घेतले. त्यांना ओझर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. जिल्ह्यात बंदकाळात अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिली.