Tue, Jun 25, 2019 13:11होमपेज › Nashik › देशात सरकार नावाची व्यवस्था फेल गेली

देशात सरकार नावाची व्यवस्था फेल गेली

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 06 2018 12:25AMनाशिक : प्रतिनिधी 

स्पर्धेचे घाणेरडे राजकारण, निवडणुकीचा खेळला जाणारा खेळ आणि सत्ता आल्यावर पैसा वसूल करण्याची धडपड यात देशातील सामान्य माणूस भरडला गेला आहे. अपेक्षापूर्ती  न झाल्याने समाजमन खदखदत असून, वर्तमान हे अस्वस्थ करणारे आहे. देशातील सरकार नावाची व्यवस्था फेल गेली असल्याचे, परखड मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्‍त केले.

गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी (दि.5) मविप्रच्या रावसाहेब थोरात सभागृहात दिमाखात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक अमीर हबीव, आनंद अ‍ॅग्रो उद्योग समूहाचे अध्यक्ष उध्दव आहेर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार आदी उपस्थित होते. यावेळी देशमुख यांच्या हस्ते दिग्दर्शक अरविंद जगताप, समाजसेविका गौरी सावंत, पोलीस अधिकारी सरिता अहिरराव, माजी नगरसेविका अश्‍विनी बोरस्ते, छायाचित्रकार सोमनाथ कोकरे, कृषी मित्र कृष्णा भामरे, डॉ.सरोज जगताप, विश्‍वास ठाकूर, डॉ.तानाजी वाघ, उद्योजक समाधान हिरे यांसह लायन्स क्‍लब संस्था आदींना यंदाचा गिरणा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप होते. 

यावेळी देशमुख यांनी पुरस्कारार्थींच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना शासकीय व्यवस्थेवर कोरडे ओढले. ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देश बदलणार ही अपेक्षा फोल ठरली. बेरोजगारी, शेतीप्रश्‍न हे प्रश्‍न देशापुढे आ वासून उभे आहेत. अन्यायकारक विषमतेमुळे खदखद निर्माण झाली असून समाजमन ज्वालामुखीच्या वाटेवर आहे. राजकारणी देश बदलू शकत नाही. मात्र, समाज हितासाठी जे काम करतात ते सर्वांसाठी आशेचा किरण आहे. अशा व्यक्‍तींची प्रतिष्ठानने पुरस्कारासाठी केलेली निवड सार्थ असल्याचे ते म्हणाले. देश बदलणे ही सोपी बाब नाही. देशामध्ये आज समता, समाजवाद दिसत नसून संविधानाची पायमल्ली सुरु आहे. राजकारणी लोक संविधानाचे पालन करत नसल्याने देशातील जनतेचे भले झाले नाही. संविधानाच्या प्रकाश वाटेवर सर्वांनी काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

यावेळी पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त करताना प्रतिष्ठानने त्यांच्या कार्याची दखल घेत दिलेल्या शाबासकीबद्दल आभार मानले. तत्पूर्वी, पुरस्कारार्थींच्या कार्याची माहिती देणार्‍या स्मरणिकेचे उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यानंतर पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष उध्दव अहिरे यांनी मनोगत व्यक्त करताना शेती व शेतकर्‍यांची होत असलेल्या उपेक्षेबाबत खंत व्यक्त केली. वैशाली अहिरे यांनी प्रास्ताविकात पुरस्कारार्थींची माहिती दिली. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.मोहन गिरी यांनी आभार मानले.

Tags : Nashik, country, system, called,  government, failed