Tue, Jul 16, 2019 23:53होमपेज › Nashik › मालेगाव : वाळू तस्करीचे राजकीय लागेबांधे उघड

मालेगाव : वाळू तस्करीचे राजकीय लागेबांधे उघड

Published On: Mar 22 2018 1:45AM | Last Updated: Mar 22 2018 1:45AMमालेगाव : प्रतिनिधी 

महसूल यंत्रणेने वाळूच्या अवैधरीत्या वाहतूक प्रकरणी पकडलेल्या दहा मालट्रक पळवापळवीचे कनेक्शन जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यापर्यंत पोहोचले असून, त्याबाबतचा अहवाल अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केला आहे. त्याचबरोबर मुंबई-आग्रा महामार्गावरून होणार्‍या विनापरवाना गौणखनिज वाहतुकीला कारणीभूत ठरणारा खापरखेडा (जि. जळगाव) येथील वाळूचा ठेका रद्द करण्याचा प्रस्तावही नाशिक व जळगाव जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य व त्यातील प्रशासकीय त्रुटी लक्षात घेता वरिष्ठांच्या आदेशावरुन मालेगाव तहसीलदारांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

वाळूमाफियांवर जरब बसविण्यासाठी अपर जिल्हाधिकारी राऊत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच धडक कारवाई करत दहा मालट्रक पकडले. त्यासाठी मुख्यालयातील अधिकार्‍यांंऐवजी देवळ्याचे तहसीलदार कैलास पवार आणि ऐनवेळी मालेगाव पोलिसांची मदत घेण्यात आली. पकडलेले दहा ट्रक मालेगाव तहसील कार्यालयात जमा केले होते. त्यापोटी बजावलेल्या दंड पावत्यांना दाद न देता सोमवारी (दि. 19) रात्री तेच दहा ट्रक तहसीलच्या गेटची कुलूप तोडून पळवून नेण्यात आले. दुसर्‍या दिवशी सकाळी 10 वाजता ही बाब उघडकीस आली. गुन्हा दाखल होण्यास दुपारचे 4 वाजले, या सर्वच बाबींची आता चौकशी सुरू झाली आहे.

कारवाई आणि मालट्रक पळवापळवी नाट्यानंतर जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचा एक पदाधिकारी अपर जिल्हाधिकारी राऊत यांना भेटून 7-8 ब्रासची वाळू दुर्लक्षित करून केवळ 2-3 ब्रासवर दंडात्मक कारवाईची मागणी केली. त्यास दुजोरा देणारा घटनाक्रम अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, जप्‍त ट्रक तहसीलच्या आवारातून गायब  केलेल्या ट्रकच्या क्रमांकावरुन प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्यानुसार मालट्रक व त्यांचे मालक शोधले जाणार असून, महामार्ग पोलिसांना तशा सूचना दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक इंद्रजित विश्‍वकर्मा यांनी दिली.

घटनेशी निगडित सर्वांचे जबाब होणार

वाळूट्रक पकडण्याच्या कारवाईत सहभागी व त्यानंतर तहसीलच्या आवारातून ट्रक पळविल्यापर्यंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असणार्‍या प्रत्येकाचे जबाब नोंदविले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक इंद्रजित विश्‍वकर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सर्वप्रथम पंचनामा करून दंडात्मक कारवाई करणारे देवळ्याचे तहसीलदार कैलास पवार यांनी छावणी पोलिसांना माहिती दिली. 

 

Tags : nashik, nashik news, sand, illegal transportation,