Sat, Jul 20, 2019 08:35होमपेज › Nashik › पालकमंत्री म्हणतात, चौकशीनंतर दोषींवर कारवाई

पालकमंत्री म्हणतात, चौकशीनंतर दोषींवर कारवाई

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 11:32PMनाशिक : प्रतिनिधी

राहुडे आणि वीरशेत येथील साथरोग रोगामुळे चार रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी तसेच रुग्णांबाबत झालेल्या घटनेविषयी अधिकारी एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न करत असतील तर याबाबत चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

येथील शासकीय विश्रामगृह येथे संबंधित विषयाचा आढावा पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांच्याकडून घेतला. परंतु, आढावा सादर करताना संंबंधित ग्रामस्थांनीच पुरेशी काळजी घेतली नाही. पावसाचे पाणी गावच्या विहिरीत आले आणि ते पिल्याने ग्रामस्थांना कसे आजार झाले तसेच अतिसाराने मृत्युमुखी पडलेले संबंधित ग्रामस्थ आधीच कसे आजारी होते आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगत अधिकार्‍यांनी आपली कातडी वाचविण्याचा प्रयत्न केला. याशिवाय आता सध्या प्रशासन संबंधित गावांमध्ये काय काय उपायययोजना करत आहेत आणि कोणती कामे हाती घेतली आहे हे सांगण्यास मात्र अधिकारी विसरले नाहीत.

परंतु, राहुडे आणि वीरशेत या गावांप्रमाणे जिल्ह्यातील इतर गावांमध्ये अशी साथरोग व घटना घडणार नाही याची यंत्रणा काय काळजी घेत आहे याबाबत मात्र कुणीही काही बोलण्यास तयार नाही. केवळ जनजागृती केली जात असल्याचे त्रोटक उत्तर देऊन आपले कर्तव्य पार पाडण्याचा अधिकार्‍यांनी प्रयत्न केला. राहुडे आणि वीरशेत येथील ग्रामस्थांनी काळजी घेतली नाही असा आरोप करणार्‍या जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यंत्रणेने पावसाळ्यापूर्वीची कामे करताना ग्रामीण भागात काय काळजी घेतली असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. हा प्रकार म्हणजे ‘आंधळ दळतयं अन् कुत्र पीठ खातयं’ असाच असल्याची प्रतिक्रिया लोकप्रतिनिधींनी व्यक्‍त केली.

तेव्हाच निधी का देत नाही?

घटना घडल्यानंतर आणि नागरिक मृत्युमुखी पडल्यानंतर पाण्याची विहीर आणि योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही तसेच आम्ही पूर्ण काळजी घेऊ साहेब अशी मखलशी जोडण्याचा प्रयत्नही जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍याने केला. मग याआधीच पाणी योजना पूर्ण करण्यास या अधिकार्‍यांना कोणी अडविले होते. इतर वेळी कामे करताना निधी नसल्याचे कारण देऊन लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांना झुलवत ठेवले जात असल्याची संतप्‍त भावना जिल्हा परिषद सदस्यांनी व्यक्‍त केली.