Wed, Jul 17, 2019 20:05होमपेज › Nashik › पंचवटीत तिघींना जाळले

पंचवटीत तिघींना जाळले

Published On: Aug 07 2018 1:00AM | Last Updated: Aug 07 2018 1:00AMपंचवटी : वार्ताहर 

पंचवटीत अनैतिक संबंधातून एका नराधम प्रियकराने प्रेयसीसह तिच्या मुलीला व नातीला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत नऊ महिन्यांच्या चिमुरडीचा करुण अंत झाला, तर दोघी माय-लेकी गंभीर जखमी झाल्या असून, मृत्यूशी झुंज देत आहेत. जळीतकांडानंतर संशयित फरार झाला असून, पोलिसांची पथके त्याच्या मागावर रवाना झाली आहेत. माणुसकीला काळिमा फासणार्‍या या घटनेमुळे नाशिककरांमध्ये तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. 

मायको दवाखान्याजवळील कालिकानगरमध्ये राहणार्‍या संगीता सुरेश देवरे (38) या महिलेचे जलालोद्दीन खान (55, रा. कानोरीय, जि. मथुरा, उत्तर प्रदेश) या व्यक्‍तीबरोबर अनैतिक संबंध होते. रविवारी (दि.5) सायंकाळी दोघांमध्ये झालेल्या वादातून पहाटे चारच्या सुमारास संगीता तिची मुलगी प्रीती आणि नात सिद्धी हे झोपेत असताना संशयित जलालोद्दीन खान या प्रियकराने त्यांच्या बेडवर आणि अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये नऊ महिन्याच्या सिद्धीचा जळून मृत्यू झाला. तर संगीता आणि प्रीती या दोघी 70 टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्या असून, त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, प्रीती रामेश्‍वर शेंडगे (20, रा. कोणार्कनगर) या मुलगी सिद्धी हिला घेऊन दोन दिवसांपूर्वी कालिकानगर येथेे आईला भेटण्यासाठी आलेल्या होत्या.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त शांताराम पाटील, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दूल, कैलास वाघ, रघुनाथ शेगर आदींसह गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दूल करीत आहे.

संगीताने संशयित जलालोद्दीन खानला आपल्याबरोबर राहू नको, म्हणून सांगितले होते. यातून त्या दोघांचे भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून त्याने हे कृत्य केले आहे. संशयिताच्या मागावर आम्ही पथके पाठविली आहेत. लवकरच त्याला अटक करू. - मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी पोलीस ठाणे