Sun, May 19, 2019 22:30होमपेज › Nashik › ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत केली सुधारणा!

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत केली सुधारणा!

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 14 2018 11:33PM

बुकमार्क करा
ओझर : मनोज कावळे

समाजात मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी राज्य सरकार विविध उपक्रम राबवित असून, याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेली ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत सुधारणा करून दि. 1 एप्रिल 2016 नंतर जन्माला आलेली मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर राज्य सरकार तिच्या खात्यावर एक लाख रुपये जमा करणार आहे.

‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेच्या प्रारंभीच्या काळात ही योजना फक्‍त दारिद्ररेषेखालील कुटुंबीयांनाच याचा लाभ घेता येत होता. राज्य सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाने यात आमुलाग्र बदल करीत आता सुधारित आदेशानुसार याचा लाभ कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबाला घेता येणार आहे. या योजनेंतर्गत एखाद्या कुटुंबात 1 एप्रिल 2016 नंतर एका कन्येचा जन्म झाला तर ती कन्या 18 वर्षाची झाल्यास राज्य शासन तिच्या खात्यावर एक लाख रुपये जमा करणार आहे. या व्यतिरिक्‍त ती कन्या 18 वर्षाची होईपर्यंत विविध टप्प्यांवर मुलींसाठी असणार्‍या शासनाच्या योजनांचा लाभदेखील तिला मिळणार आहे.

मुलीचा जन्म झाल्यानंतर तिचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी कुटुंबीयांना 5 हजार रुपयेदेखील मिळणार आहेत. त्याचप्रमाणे मुलीच्या आजी-आजोबांना 5 हजार रुपयांच्या किमतीचे सोन्याचे नाणे भेट देण्यात येणार आहे. ती मुलगी पाच वर्षाची होईपर्यंत प्रत्येकवर्षी तिच्या पोषणासाठी दोन हजार रुपयेदेखील मिळणार आहेत. पाच वर्षाची मिळून होणारी रक्‍कम दहा हजार इतकी असून, मुलगी शाळेत गेल्यानंतर पहिली ते पाचवीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रतीवर्षी अडीच हजार रुपये शासन देणार आहे. या पाच वर्षात एकूण रक्‍कम साडेबारा हजार रुपये होणार असून, त्यापुढील शिक्षणासाठी म्हणजेच सहावी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रतीवर्षी तीन हजार रुपये शासन देणार असून ही रक्‍कम 21 हजार इतकी होणार आहे. याचदरम्यान मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला एकरकमी एक लाख रुपये शासन तिच्या नावावर करणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेची महत्वपूर्ण अट घातली आहे. योजनेची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक तालुका बालविकास प्रकल्प अधिकार्‍याकडे उपलब्ध असून, ही योजना 1 एप्रिल 2016 पासून लागू करण्यात आली आहे. संबंधित कुटुंबात दोन मुली असतील तर त्यातील प्रत्येक मुलीला या योजनेचा अर्ध्या रकमेचा लाभ मिळणार आहे.