Thu, Jul 18, 2019 12:42होमपेज › Nashik › महापौरांच्या प्रभागात ग्रीन सिटीला हरताळ

महापौरांच्या प्रभागात ग्रीन सिटीला हरताळ

Published On: Mar 05 2018 1:44AM | Last Updated: Mar 04 2018 10:59PMपंचवटी : वार्ताहर 

महापौर रंजना भानसी यांच्या प्रभागात असलेल्या महाराष्ट्र ट्युबरक्युलॉसिस (टीबी) सॅनेटोरियमच्या आवारात असलेली जवळपास 21 काटेरी बाभळीच्या झाडांची कत्तल करण्यात आल्याने वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी वृक्षतोड झाली आहे. त्याठिकाणापासून हाकेच्या अंतरावर महापौरांचे सहयोगी नगरसेवक राहतात त्यांना देखील बेकायदेशीर वृक्षतोड दिसली नाही का असा प्रश्‍न वृक्षप्रेमींनी उपस्थित केला आहे. महापौर आणि आयुक्त या बेकायदेशीर वृक्षतोड करणार्‍या दोषींवर काय कारवाई करणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.  

म्हसरूळ परिसरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये असलेल्या महाराष्ट्र ट्युबरक्युलॉसिस (टीबी) सॅनेटोरियमच्या आवारात असलेली जवळपास 21 काटेरी बाभळीची झाडे मनपाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररीत्या तोडण्यात आली आहेत. याबाबत वृक्षप्रेमी असलेल्या दीपक जाधव यांना स्थानिक नागरिकांनी फोन करून वृक्षतोड होत असल्याची माहिती दिली होती.

त्यानंतर जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता त्यांना जवळपास 21 काटेरी बाभळीची झाडे तोडण्यात आल्याचे दिसून आले. याबाबत जाधव यांनी मनपा अधिकार्‍यांना फोन करून घटनेची माहिती देत मनपाच्या ऑनलाइन अ‍ॅपवर तक्रार देखील नोंदविली. मात्र, पुढे कोणतीच कारवाई न झाल्याने रविवारी (दि.4) पुन्हा याठिकाणी असलेल्या झाडांचे बुंधे जमिनीतून काढण्यासाठी जेसीबी आणला गेल्याची माहिती पुन्हा नागरिकांनी जाधव यांना दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून झाडाचे बुंधे काढण्याचे काम थांबविले. याबाबत मनपाचे उद्यान निरीक्षक वसंत ढुमसे यांना फोन केला असता त्यांनी आम्हाला माहिती मिळाली असून, नोटीस देण्याची कारवाई करीत असल्याचे मोघम उत्तर दिले.

विशेष म्हणजे झाडे तोडली गेली असल्याने याबाबत थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे गरजेचे असताना महापालिकेकडून नोटीस देण्याचे सोपस्कार पार पाडले जात असल्याने याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिकार्‍यांवर लोकप्रतिनिधींचा दबाव असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे. या बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत महापौर रंजना भानसी आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे काय कारवाई करणार याकडे नाशिकच्या जनतेचे लक्ष लागले आहे.