Thu, Jun 27, 2019 18:05होमपेज › Nashik › अवैध वाळू वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर जप्‍त

अवैध वाळू वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर जप्‍त

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 22 2018 11:44PMमालेगाव : प्रतिनिधी

गिरणा नदीतून होणार्‍या अवैध वाळू वाहतुकीला रोखण्यासाठी तहसील व विशेष पोलीस पथकाने मंगळवारी संयुक्‍त कारवाई केली. सवंदगाव शिवारातून वाळूच्या चोरट्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले सहा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. कारवाईच्या भीतीने अन् त्याची खबर लागल्याने ट्रॅक्टरचालक मात्र फरार झाला.  

तहसीलदार ज्योती देवरे व विशेष पोलीस पथकाचे उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. एक ट्रॅक्टर वाळूने भरलेला, तर पाच रिकामे होते. गिरणा नदी त्यातल्या त्यात धरणाजवळील सवंदगाव शिवारातील नदीपात्रातून वाळूचोरी पंचक्रोशीसाठी नवीन नाही. वर्षभरात सातत्याने कारवाई होते. त्यानंतरही वाळूमाफियांवर काहीच परिणाम होत नसल्याचे चित्र आहे. तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त केलेले मालट्रक पळविण्यापर्यंत वाळूचोरट्यांची मजल गेल्याने त्यांच्या निर्ढावलेपणाची कल्पना येते. वाळूचे लिलाव होत नाही. त्यांचा ग्रामसभा विरोध करतात, यातून वाळूमाफियांचे फावते, असे चित्र आहे.

अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी केलेल्या धडक कारवाईनंतर मंदावलेली वाळू वाहतूक पुन्हा तेजीत आल्याच्या तक्रारी होत्या. मंगळवारी सवंदगाव शिवारातून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली. त्यांनी विशेष पोलीस पथकाला समवेत घेत सवंदगावकडे निघाल्या. वाळू चोरट्यांची यंत्रणा प्रशासनापेक्षाही सतर्क असल्याचा प्रत्यय याठिकाणी आला. पथक धडकण्यापूर्वी वाळू चोरटे ट्रॅक्टर सोडून पसार झाले. एका ट्रॅक्टरमध्ये वाळू आढळली. इतर पाच ट्रॅक्टरमधील वाळू कारवाईच्या भीतीने रीती केली गेल्याचा अंदाज आहे. ते सर्व जप्त करण्यात आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे तहसीलदार देवरे यांनी सांगितले.