Mon, May 20, 2019 08:19होमपेज › Nashik › अवैध वाळू उपशाने मालेगावी घेतला तरुणाचा बळी 

अवैध वाळू उपशाने मालेगावी घेतला तरुणाचा बळी 

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 03 2018 10:48PMमालेगाव : वार्ताहर

तालुक्यातील संवदगाव गावाजवळून वाहत असलेल्या गिरणानदीलगत असलेल्या मातीमिश्रित वाळू खदानीत सोमवारी (दि.3) सकाळी 10 च्या सुमारास अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असताना खदान खचल्याने 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. महसूल विभाग, पोलिसांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याने ही खदान सुरू होत, त्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

उच्च न्यायालयाने राज्यात वाळू लिलावाला स्थगिती दिली होती. आता जिल्हास्तरावरून वाळू लिलावाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यात वाळू माफियांनी डोके वर काढले आहे. अवैधरीत्या वाळू उपसून तिची वाहतूक करणार्‍यांवर संबंधीतांकडून कारवाई होत नाही. त्यामूळे वाळूमाफियांचे फावले आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गौणखनिज व वाळूची चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वाळूमाफिया रात्री-बेरात्री नदीपात्रात उतरून वाळू उपसा करीत आहेत. त्यामुळे नदीमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच गिरणा नदीला पूरपाणी वाहत असतानाही दाभाडी येथील रोकडोबा मंदिराजवळ पाण्यात उतरुन हे वाळूमाफिया राजरोसपणे वाळू उपसा करीत आहे.

सवंदगाव गावाजवळून वाहणार्‍या गिरणा नदीपात्रालगत अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍यांनी 18 ते 20 फूट उंचीचे खदाण केले आहे. याच खदानीत व नदीपात्रात दरदरोज 25 ते 30 ट्रॅक्टरमार्फत वाळू उपसा केला जातो. नेहमीप्रमाणे सोमवारी (दि.3) सकाळी 10 वाजेच्या सुमारास अवैधरित्या वाळू  उपसा सुरू होता. भावडू रामचंद वाघ (22) रा. रौंझाणे, भोलेनाथ लालचंद माळी (18), राकेश शांताराम माळी (32) दोघे रा. म्हाळदे शिवार असे तिघे जण मालेगाव येथील युसूफ पहिलवान याच्या मालकीचा ट्रॅक्टर (क्रमांक एमएच 41 डी 7684) मधून खदानीत वाळू उपसा करण्यासाठी आले. ट्रॅक्टर भरत असताना अचानक मातीमिश्रित वाळू खदान कोसळली. त्यात भावडू, भोलेनाथ व राकेश हे तिघे जण  दाबले गेले. यावेळी जवळच असलेल्या तरुणांनी आरडाओरड केल्यानंतर गावकर्‍यांनी खदानीत दाबलेल्या तरुणांना बाहेर काढले. यात भावडू वाघ हा जागीच ठार झाला. तर भोलेनाथ व राकेश हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अवैधरीत्या वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेत पंचनामा केला. या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.