Wed, Jul 24, 2019 12:21होमपेज › Nashik › प्रसूतीसाठी आलेल्या महिलेकडे  मनपा रुग्णालयाचे पुन्हा दुर्लक्ष  

प्रसूतीसाठी आलेल्या महिलेकडे  मनपा रुग्णालयाचे पुन्हा दुर्लक्ष  

Published On: Dec 28 2017 1:45AM | Last Updated: Dec 28 2017 1:40AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयातली मृत अर्भकाची घटना ताजी असतानाच प्रसूतीसाठी आलेल्या आणखी एका महिलेला तेथील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणाला सामोरे जावे लागल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित महिला नगर जिल्ह्यातील शिरूर येथील असून, तिचे उपचार मनपा दवाखान्यात सुरू नव्हते. यामुळे तिला असलेल्या अडचणींबाबत कोणतीही माहिती नसल्यानेच बिटको रुग्णालयात तिला व बाळाला संदर्भित करण्यात आल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय विभागाने दिले आहे. 

गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी मायको रुग्णालय आणि गेल्या आठवड्यातच इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांकडे डॉक्टर व नर्सेसनी दुर्लक्ष केले होते. या दोन्ही प्रकरणांची चौकशी वैद्यकीय विभागाने करत मायको रुग्णालयातील डॉक्टरसह चार नर्सला निलंबित केले होते तर इंदिरा गांधी रुग्णालयप्रकरणी संबंधितांना क्‍लिन चीट देण्यात आली आहे. याच प्रकरणात एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले बालक व त्याबाबतची चौकशी अद्याप प्रलंबित आहे.

या दोन्ही घटना ताज्या असतानाच बुधवारी (दि.27) इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसूतीसाठी गेलेल्या एका महिलेकडे तेथील डॉक्टर व कर्मचार्‍यांनी दुर्लक्ष केल्याची बाब समोर आली आहे. महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिला व तिच्या बाळाला बिटको रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. या दरम्यान संबंधितांकडून दुर्लक्ष झाल्याने त्या महिलेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. यामुळे मनपाच्या रुग्णालयांविषयी पुन्हा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या आरोपांबाबत मनपा वैद्यकीय विभागाने मात्र यासंदर्भात रुग्णालयाकडून कोणतीही चूक झालेली नसल्याचे म्हटले आहे. 

रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा सोनोग्राफी रिपोर्ट पाहिला असता त्यात तिच्या बाळात अनेक व्यंग असल्याचे डॉ. आसावरी लोमटे यांना आढळून आले. यामुळे तिच्या नातेवाइकांना त्याची कल्पना देण्यात आली. बाळ पायाळू असल्याने धोका होता. याबाबतही संबंधितांना माहिती देण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातील डॉ. पाटील यांनी बिटको रुग्णालयाशी बोलणे करून रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी त्यांना तिकडे पाठविल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी सांगितले.