Sun, Mar 24, 2019 10:38होमपेज › Nashik › करवाढ लादल्यास एकही महासभा होऊ देणार नाही 

करवाढ लादल्यास एकही महासभा होऊ देणार नाही 

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 04 2018 11:40PMनाशिक : प्रतिनिधी

आचारसंहिता उठल्याने आता करवाढीसंदर्भात भाजपाने आपली भूमिका नाशिककरांसमोर स्पष्ट करावी. यासंदर्भात येत्या महासभेत शिवसेना जाब विचारणार आहे. सत्ताधारी भाजपाकडून स्पष्टपणे निर्णय घेतला जात नसेल तर महासभा होऊ देणार नाही, असा इशारा मनपाचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि गटनेते विलास शिंदे यांनी देत सत्ताधार्‍यांना नाशिककर हवे की प्रशासन याचे उत्तर द्यावे, असे आवाहन केले आहे. 

घरपट्टीतील अव्वाच्या सव्वा वाढ आणि शेतजमिनींसह मोकळ्या मैदाने तसेच पार्किंग व सामासिक अंतरावर करयोग्य मूल्य वाढ केल्याने त्यास विरोधकांसह अन्याय निवारण कृती समितीतर्फे विरोध करण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यांपासून याबाबत विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहे. विधान परिषद आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून हा विषय देखील मागे पडला होता. 

आचारसंहितेच्या काळात झालेल्या महासभेत 127 पैकी जवळपास 87 नगरसेवकांनी करवाढीच्या विरोधात आपले मत मांडत करवाढ रद्द करण्याची मागणी केली होती. त्या महासभेची आठवण विरोधी पक्षनेते बोरस्ते यांनी करून दिली. शिवसेनेने करवाढीसंदर्भात लक्षवेधी मांडली होती. महासभेत नगरसेवकांनी केलेल्या एकमुखी मागणीनुसार त्यावेळी महापौर रंजना भानसी यांनी करवाढ रद्द करण्याची कार्यवाही करावी, असा निर्णय दिला होता. यामुळे आता आचारसंहिता संपल्याने त्याबाबतचा ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कारण शेतकरी, मालमत्ताधारक आणि सामान्य नागरिक सत्ताधारी भाजपा करवाढीबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लावून असल्याचे बोरस्ते, शिंदे यांनी सांगितले. भाजपाला करवाढ मान्य आहे की अमान्य याबाबत भूमिका स्पष्ट करावी. शिवसेना नाशिककरांबरोबर आहे. करवाढ लादल्यास त्यास भाजपा जबाबदार असेल. याबाबत आम्ही महासभेत जाब विचारणार असून, भाजपाने योग्य निर्णय न घेतल्यास यापुढील महासभा होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.