Wed, Jul 24, 2019 06:31होमपेज › Nashik › गुन्हेगारी वाढल्यास पोलीस ठाणेप्रमुख जबाबदार

गुन्हेगारी वाढल्यास पोलीस ठाणेप्रमुख जबाबदार

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 04 2018 11:30PMनंदुरबार : प्रतिनिधी

नंदुरबार, धुळे  व जळगाव शहरात वाळू, गुटखा व लूटमार करणार्‍या गुन्हेगारी टोळ्या तयार होत आहेत. त्यांचा बीमोड पोलीस विभागाला करावयाचा असून, तिन्ही जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, ज्या पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध धंदे सुरू असतील अशा ठाणे प्रमुखांवर सक्त कारवाई करण्याची तंबी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी तिनही जिल्ह्याच्या संयुक्त आढावा बैठकीत दिली. नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात ही बैठक झाली.

ना. केसरकर म्हणाले, पोलीस अवैध व्यवसायांवर धाडी टाकतात, जिवावर उदार होवून कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करतात. मात्र,पोलिसांप्रती जनतेमध्ये संशय निर्माण होतो ही प्रतिमा दूर करण्यासाठी पोलीस विभागाने कामाचा दर्जा सुधारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार उपनगरमध्ये पोलीस ठाण्याची अत्यंत आवश्यकता असून याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. तसेच, जिल्ह्यांत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून रेती, व्यापार्‍यांना लूटमार, गुटखा तस्करी करणार्‍यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, असेही मागणी त्यांनी गृहराज्यमंत्री यांच्याकडे केली.

आमदार शिरीष चौधरी यांनी जळगाव जिल्ह्यात अमळनेर व शेंदुर्णी येथे पोलीस ठाणे उभारावे. तसेच, नंदुरबार जिल्ह्यात गुन्हेगारी व्यक्तीच्या लोकांचे वर्चस्व असून अशा लोकांवर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी केली.प्रारंभी जिल्हा पोलीसप्रमुख संजय पाटील, एम. रामकुमार आणि दत्तात्रय कराळे यांनी आपल्या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती दिली. बैठकीला आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जळगाव व नंदुरबारचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे आदी उपस्थित होते.

पोलिसांच्या घरांचा प्रश्‍न सोडविणार

पोलीस कर्मचार्‍यांकडून कामाची उपेक्षा करतानाच शासन त्यांच्या समस्यांबाबतही गंभीर असून, पोलिसांचा घराचा प्रश्‍न, कॅन्टिंन, जिम, अपूर्ण कर्मचारी व काही ठिकाणी पोलीस ठाण्यांचे बांधकाम याबाबत निधी उपलब्ध करण्यासाठी वेगळा लेखाशीर्ष तयार करण्यात आला असून या लेखाशिर्षातून मोठ्या प्रमाणात पोलीस विभागाला उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.