Fri, Mar 22, 2019 01:27
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › आयपीएल सट्टेबाजी; मोठे सिंडीकेट उघड

आयपीएल सट्टेबाजी; मोठे सिंडीकेट उघड

Published On: May 06 2018 1:10AM | Last Updated: May 05 2018 11:58PMनाशिक : प्रतिनिधी

आयपीएलमधील क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन, मोबाइलवरून सट्टा लावणार्‍या  उत्तर महाराष्ट्रात 14 बुकींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 8 लाखाचा मुद्देमाल जप्‍त केला. जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून एका भाजपा पदाधिकार्‍यासह पाच जणांना अटक केली. दुसर्‍या घटनेत नाशिकरोड रेल्वेस्थानकातून सात, तर मनमाडमधून दोन बुकींना ताब्यात घेण्यात आले आहे.

छत्तीसगढ येथील सात सट्टेबाजांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक रोड रेल्वेस्थानकातून ताब्यात घेतले आहे. सातही सट्टेबाज छत्तीसगढ पोलिसांच्या रेकॉर्डवरील बुकी असून, त्यांना पकडून देणार्‍यास 10 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केलेले आहे. या सट्टेबाजांकडून हायटेक यंत्रणेसह 25 मोबाइल व रोकड असा चार लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे.

छत्तीसगढ राज्यातील बिलासपूर पोलिसांनी नाशिक ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याकडील सात फरार सट्टेबाज नाशिक किंवा शिर्डी येथे पळून येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे व त्यांच्या पथकाने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सापळा रचला. गीतांजली एक्स्प्रेसमध्ये तपासणी केली असता सातही संशयित आढळून आले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सट्टेबाजांकडून 25 महागडे मोबाइल, लॅपटॉप, पेनड्राइव्ह, डायर्‍या असा मुद्देमाल आढळून आला. या सट्टेबाजांविरोधात छत्तीसगढ राज्यात अनेक गुन्हे दाखल असून, त्यांना पकडून देणार्‍यास 10 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ गुरुळे, रवींद्र शिलावट, हवालदार शिवाजी जुंदरे, बंडू ठाकरे, पोलीस नाईक प्रीतम लोखंडे, अमोल घुगे, रमेश काकडे, पोलीस शिपाई संदीप हांडगे, संदीप लगड आदींच्या पथकाने केली. संशयितांना छत्तीसगढ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मनमाडमध्ये जिल्हा पोलीसप्रमुखांच्या विशेष पथकाने शहरातील एका बंगल्यावर रात्री छापा मारून आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणार्‍या दोन जणांना अटक केली, तर तीन जण फरार झाले आहेत. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून एक लाख 90 हजार रोख रकमेसह लॅपटॉप, मोबाइल आणि धनादेश जप्त करण्यात आले आहेत.

तिसर्‍या घटनेत चोपड्यातील भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी घनश्याम अग्रवाल यांना रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलिसांनी शनिवारी सकाळी चोपड्यातून अटक केली. या कारवाईने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पाच बड्या बुकींसह एका बँक मॅनेजरसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाणेअंतर्गत असलेल्या चौक गावातील लीलाई हॉटेलमध्ये आयपीएलवर सट्टा बेटिंग सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत एका बँक मॅनेजरसह पाच बुकींना तीन दिवसांपूर्वी अटक केली होती. यावेळी संशयितांच्या ताब्यातून सव्वा लाखाची रोकडही जप्त करण्यात आली होती. पोलीस चौकशीत आरोपींचे पुण्यातील बुकीशी कनेक्शन आढळल्यानंतर विजय अग्रवाल या बुकीस अटक करण्यात आली. तर त्याने घनश्याम अग्रवाल यांचे नाव बुकी म्हणून सांगितल्यानंतर व त्यांच्याकडे कटिंग फिरवल्याची माहिती दिल्यानंतर अग्रवाल यांना शनिवारी सकाळी खालापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश शेलार व त्यांच्या पथकाने अटक केली. संशयितांची नावे : किसनचंद गोधुमल बजाज, नारायणदास माधवदास नागवाणी, शिवकुमार छेदीलाल साहू, संजयकुमार मुरलीधर कृष्णानी, मुरली अशोक लोकवाणी, विजयकुमार नारायणदास बजाज, आकाश प्रभात शर्मा (सर्व रा. बिलासपूर, राज्य छत्तीसगढ)