Tue, Jul 07, 2020 22:30होमपेज › Nashik › घरपट्टी थकबाकी न भरल्यास मिळकत जप्‍तीनंतर लिलाव

घरपट्टी थकबाकी न भरल्यास मिळकत जप्‍तीनंतर लिलाव

Published On: Feb 27 2018 1:59AM | Last Updated: Feb 26 2018 11:25PMनाशिक : प्रतिनिधी

मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या 94 हजार थकबाकीदारांच्या अंतिम नोटीसची मुदत संपत आल्याने आता संबंधितांना मालमत्ता जप्‍तीचे वॉरंट काढण्यात येणार आहे. यानंतरही थकबाकी न भरल्यास अशा मालमत्तांचा मनपा थेट लिलाव करणार आहे. मार्चअखेर जवळ येऊन ठेपल्याने मालमत्ता कर वसूल करण्यासाठी मनपाच्या मूल्य निर्धारण व विविध कर विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. 

जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांत कर विभागाने मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीदारांना अंतिम नोटीस बजावून थकबाकी भरण्याची सूचना केली आहे. जवळपास 242 कोटींची प्रशासनाची मागणी आहे. त्यापैकी 75 कोटींची वसुली झाली असून, अद्याप चालू वर्षाची मागणी आणि मागील थकबाकी मिळून 167 कोटी रुपये वसूल होणे बाकी आहे. यामुळे ही रक्‍कम मनपा तिजोरीत जमा होण्याच्या द‍ृष्टीने अंतिम नोटीस बजावलेल्या मिळकतधारकांना आता मिळकत जप्‍तीचे वॉरंटदेखील बजावले जात आहेत. यामुळे यंदा मोठी थकबाकी वसूल होण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे.