होमपेज › Nashik › कचरा विलगीकरणासाठी घंटागाडी ठेकेदारांना अल्टिमेटम

कचरा विलगीकरणासाठी घंटागाडी ठेकेदारांना अल्टिमेटम

Published On: Mar 14 2018 12:51AM | Last Updated: Mar 13 2018 11:56PMनाशिक : प्रतिनिधी

शहरातून संकलित होणारा कचरा विलगीकरण करण्यासाठी आयुक्‍तांनी घंटागाडी ठेकेदारांना 31 मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. सध्या केवळ 30 टक्के इतक्याच कचर्‍याचे विलगीकरण होत आहे. हे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत आणण्याच्या द‍ृष्टीने मनपा प्रशासनाने घंटागाडी ठेकेदारांची बैठक घेऊन कचरा विलगीकरणाचे आदेश दिले आहेत. 

शहरातून दररोज सुमारे 450 मे. टन इतका कचरा घंटागाड्यांद्वारे संकलित करून तो कचरा डेपोवर नेला जातो. त्या ठिकाणी कचर्‍यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती तसेच कांडी कोळसा, ऊर्जानिर्मिती यासारखे उत्पादन केले जात आहे. खत प्रकल्पावर येणारा कचरा मिश्र स्वरूपात येत असल्याने त्या ठिकाणी कचर्‍याचे विलगीकरण करण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. यामुळे वेळ आणि श्रम वाया जात असल्याने घराघरांतून कचरा संकलित करतानाच तो ओला आणि सुका या स्वरूपात मिळाला तर मनपाला आर्थिक फायदा होणार आहे. शिवाय वेळेचीही बचत होणार असल्याने प्रशासनाने घंटागाडी ठेकेदारांना त्याबाबतचे आदेश दिले आहेत.