नाशिक : प्रतिनिधी
स्वच्छ सर्वेक्षणात ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यात नाशिक जिल्हा देशात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा ठरला असून, शनिवारी औरंगाबाद येथेे आयोजित संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हा परिषदेचा सन्मान करण्यात आला.
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेलकंदे यांनी हा सन्मान स्वीकारला.
सन 2016-17 च्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्यस्तरीय विशेष पुरस्कार मिळालेल्या दिंडोरी तालुक्यातील आवनखेड ग्रामपंचायतीलाही यावेळी सन्मानित करण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम आलेल्या माळेगाव (ता. सिन्नर), द्वितीय अवनखेड (ता. दिंडोरी) व ओढा (ता. नाशिक) या ग्रामपंचायतींनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
त्याचप्रमाणे 2017 मध्ये केंद्र शासनाच्या वतीने ‘संकल्प से स्वच्छ सिद्धी’ अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत चेतना जाधवला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 अंतर्गत गावाची तपासणी ऑगस्टमध्ये करण्यात आली. ग्रामस्थांनी सहभागी व्हावे यासाठी जिल्ह्यात कुटुंबसंपर्क अभियान राबवून घरोघरी गृहभेटी देण्यात आल्या. तसेच सरकारने विकसित केलेल्या मोबाइल अॅपद्वारे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. जिल्ह्यातून दोन लाख 21 हजार 321 ग्रामस्थांनी प्रतिक्रिया नोंदविल्या.