Wed, May 27, 2020 02:23होमपेज › Nashik › विराट-अनुष्काचा नाशिकमध्ये हनिमून!

विराट-अनुष्काचा नाशिकमध्ये हनिमून!

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 21 2017 1:20AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

देशातील सर्वाधिक चर्चेत असलेली विराट कोहली व अनुष्का शर्मा ही ग्लॅमरस जोडी हनिमूनसाठी नाशिकमध्ये दाखल झाली आहे. हे ऐकून धक्‍का बसू शकेल; पण या जोडीचे नाशिकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांची ही गोदाघाटापासून ते थेट नांदगावपर्यंतची छायाचित्रे पाहून क्षणभर अचंब्यात पडणार्‍या लोकांच्या चेहर्‍यावर दुसर्‍याच क्षणी हसूही फुलत आहे.

स्टार क्रिकेटपटू विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी प्रेमप्रकरणावरून गेल्या चार वर्षांपासून माध्यमांमध्ये चर्चेत होती. दोघांचे सूत जुळल्याच्या, ब्रेकअप झाल्याच्या, वाद मिटल्याच्या व विवाह ठरल्याच्या बातम्या वेळोवेळी ठळकपणे प्रसारित होत होत्या. अखेर दि. 11 डिसेंबरला मोजक्या नातेवाइकांच्या साक्षीने इटलीतील मिलान येथे विवाहबद्ध होत या जोडीने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. या बहुचर्चित विवाहाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर मधुचंद्रादरम्यान अनुष्का शर्माने विराटसमवेत बर्फवृष्टीचा आनंद घेतानाचा सेल्फी ट्विटरवर पोस्ट केला होता. ‘इट्स हेवन, लिटररी..’ अशी ओळही तिने त्याखाली लिहिली होती. हे छायाचित्रही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. 

तथापि, जगातील प्रत्येक घटनेवर गमतीशीर भाष्य करणार्‍या सोशल मीडियाला या फोटोमुळे आयतेच कोलित मिळाले. एरवी राजकारण्यांच्या फोटोवर ‘कलाकुसर’ करणार्‍या संगणक बहाद्दरांनी सध्या विराट-अनुष्काचे छायाचित्र निवडले आणि त्यात फोटोशॉपद्वारे बदल करून या जोडीला थेट नाशिकलाच आणून सोडले आहे. नाशिकरोड रेल्वेस्टेशन, गोदाघाट, सोमेश्‍वर, कपालेश्‍वर मंदिर अशा शहरातील निरनिराळ्या ठिकाणच्या छायाचित्रांवर ‘विरानुष्का’चा सेल्फी लावून ही छायाचित्रे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर पोस्ट करण्यात आली असून, ती नाशिककरांमध्ये व्हायरल होत आहेत.

नाशिककरांनी सुरू केलेल्या या ‘टाइमपास’ उद्योगात ग्रामीण भागही मागे राहिलेला नाही. परिणामी, ही जोडी हनिमूनसाठी थेट नांदगाव, सटाण्यातही दाखल झाल्याचे चित्र आहे. विरानुष्काची ही छायाचित्रे चांगलेच मनोरंजन करीत असून, नाशिकमध्ये आल्यावर या जोडीला गोदाघाटावरील अस्वच्छतेपासून ते वाहतूक कोंडीपर्यंत काय काय सोसावे लागेल, याच्याही रंजक चर्चा रंगत आहेत.