Mon, Jun 17, 2019 04:45होमपेज › Nashik › ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करा : हिना गावित

‘त्या’ पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करा : हिना गावित

Published On: Aug 06 2018 6:11PM | Last Updated: Aug 06 2018 6:19PMनंदुरबार : प्रतिनिधी

धुळे येथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान आपल्या वाहनावर चढून हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू न करता त्यांना सोडून देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करावी. अशी मागणी भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांनी संसदेत केली आहे.

गावित यांच्या वाहनावर चढून मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी काचा फोडल्‍याची घटना काल रविवारी घडली होती. या विषयीची फिर्याद त्यांनी स्वतः दिली असताना संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवताना ॲट्रॉसिटीचे कलम लावले नाही.  अशी तक्रार त्यांनी आज संसदेत मांडली. संसदेत तातडीने हा विषय उपस्थित करून हिना गावित यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ज्या हल्लेखोरांनी ही घटना घडवली त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला, ही संतापजनक गोष्ट असून जातीय द्वेषातून हे घडल्याचे दिसत आहे, असे देखील त्या म्हणाल्या. 

केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी संसदेत मांडली.  दरम्यान, धुळे येथे मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे तीव्र पडसाद नंदुरबार जिल्ह्यात उमटले असून, प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच विविध सामाजिक संघटनांनी निषेध मोर्चा काढून संताप व्यक्त केला आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चकऱ्यांनी खासदार हिना गावित यांच्या वाहनावर हल्ला करण्याचे भ्याड कृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा आणि कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करणारे निवेदन सादर केले. मोर्चा काढण्यापूर्वी नंदुरबार शहरातील प्रमुख चौकांमध्ये संतप्त कार्यकर्त्यांनी उग्र निदर्शने केली. चौकाचौकात टायर जाळून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच आदिवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढून संपूर्ण शहरातून बंदचे आवाहन केले. नवापूर, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा या सर्व ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला.