Sun, Sep 23, 2018 09:49होमपेज › Nashik › बाजार समिती बरखास्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

बाजार समिती बरखास्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 09 2018 11:57PM

बुकमार्क करा
पंचवटी : वार्ताहर 

नाशिक कृषी उत्पन्‍न बाजार समिती बरखास्तीला उच्च न्यायालयाने 13 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळाला म्हणणे मांडण्यासाठी पुन्हा एकदा वेळ मिळाला आहे. निर्दोष संचालकांसह दोषी संचालकांनादेखील संधी मिळणार आहे. चुकीच्या पद्धतीने संचालक मंडळ बरखास्त केल्यामुळेच ही वेळ आल्याची चर्चा समितीमध्ये रंगली आहे.  

नाशिक कृषी उत्पन्‍न बाजार समिती संचालक मंडळ 30 डिसेंबर रोजी बरखास्त करण्यात आल्याचे आणि बाजार समितीवर प्रशासक नेमल्याचे जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी जाहीर केले होते. बाजार समिती बरखास्त झाली पाहिजे आणि प्रशासक नेमून झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून त्यातील दोषींना कडक शासन करावे, ही मागणी करणार्‍या व मंडळाच्या मनमानी कारभाराविरोधात  विरोधाची भूमिका घेणार्‍या संचालकांनादेखील दोषी धरून त्यांच्यावरही बरखास्तीची कारवाई केल्याने त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. अखेर मंगळवारी उच्च न्यायालयाने बाजार समिती बरखास्तीला दि. 13 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिल्याने संचालक मंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे.