Thu, Apr 25, 2019 14:05होमपेज › Nashik › खासदार गावित हल्ला : तिघांना अटक

खासदार गावित हल्ला : तिघांना अटक

Published On: Aug 07 2018 1:00AM | Last Updated: Aug 06 2018 11:33PMधुळे : प्रतिनिधी

धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात खासदार हीना गावीत यांच्या गाडीची तोडफोड करणार्‍या तीन जणांना सोमवारी शहर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, हा हल्ला पूर्वनियोजित कट असून, या घटनेप्रकरणात पोलीस अधीक्षक यांची तातडीने बदली करण्याची मागणी खा. डॉ. हीना गावित यांनी केल्याने सायंकाळी धुळ्याच्या पोलीस अधीक्षक पदावर विश्‍वास पांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यापूर्वीच्या आदेशात धुळ्याचे पोलीस अधीक्षक रामकुमार यांची राज्य राखीव दलाच्या समादेशक पदावर बदली झाली आहे. 

धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीच्या बैठकीसाठी आलेल्या खा. डॉ. हीना गावित यांच्या गाडीची मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी तोडफोड केली होती. या घटनेनंतर रात्री उशिरा आंदोलक अमोल मराठे यांच्यासह 20 ते 25 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात सकाळपासून अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे आणि पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी आंदोलनाच्या समन्वयकांबरोबर चर्चा सुरू केली. तोडफोड करणार्‍या कार्यकर्त्यांचे फोटो व्हायरल झाल्याने या आधारावर पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून यादी तयार करण्याचे काम सुरू केले. यात गाडीच्या छतावर चढून घोषणाबाजी करणारे अमोल भागवत, दिनेश आटोळे, अमोल चव्हाण यांना क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. 

हल्ला पूर्वनियोजित नसल्याचा खुलासा

धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर जातांना खा. डॉ. हीना गावित यांच्या गाडीवर झालेल्या हल्लाचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली असून, हा प्रकार पूर्व नियोजित नव्हता. मात्र, काही लोक या घटनेला आदिवासी विरूध्द मराठा असा रंग देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी पत्रकार सांगितले. धुळ्यात सुरू असलेल्या आंदोलन स्थळावर  झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज मोरे यांच्यासह सचिव निंबा मराठे, साहेबराव देसाई, भोला वाघ, जगदीश कदम, यांच्यासह संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळीमोरे यांनी गेल्या 16 दिवसांपासून या ठिकाणी आरक्षणाच्या प्रश्‍नांवर आंदोलन सुरू आहे.

मात्र, प्रशासनाने तसेच शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे कार्यकत्यांमध्ये रोष होता. रविवारी आंदोलन स्थळावर कौटुंबीक मेळावा घेण्यात आला होता. यासाठी मोठ्या प्रमाणावर महिला, लहान बालके सहभागी झाली होती. याच दिवशी नियोजन समितीची बैठक देखील होती. या बैठकीसाठी  पालकमंत्री दादा भुसे यांच्याबाबत कार्यकत्यांचा रोष होता. त्यामुळे त्यांच्या गाडीसमोर आंदोलन करण्यासाठी कार्यकर्ते प्रवेशद्वारासमोर उभे होते. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमधे रेटारेटीत दरवाजा उघडला. यानंतर काही कार्यकर्ते थेट खा. गावित यांच्या गाडीवर चढले. हा प्रकार काही सेकंदात झाला. या घटनेचा मराठा क्रांती मोर्चा दिलगीर असल्याचे त्यांनी सांगितले.